मोडकळीस आलेल्या शाळेच्या जागी प्रशस्त इमारतीसाठी हालचाली
ठाणे: महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची विद्यार्थी संख्या १४०० पर्यंत पोहोचली असून ही इमारत मोडकळीस आली आहे. विशेष म्हणजे कधी-कधी जागेअभावी एक खोलीत दोन-दोन वर्ग चालवले जात आहेत. नवीन प्रशस्त इमारतीसाठी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा गळ घातल्याने नुकतीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या पातलीपाडा येथील मराठी शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग सुरू झाले असून, विद्यार्थी संख्या १४०० पर्यंत पोहोचली आहे. या शाळेची इमारत जुनी झाली असून, वर्गखोल्याही अपुऱ्या पडत आहेत. अनेकवेळा एका खोलीतच दोन वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शाळेची प्रशस्त इमारत उभारण्यासाठी भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी पुढाकार घेतला आहे. पातलीपाडा येथे महापालिकेचा सुविधा भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडावर महापालिकेची शाळा उभारावी, या मागणीसाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. तसेच या ठिकाणी शाळेच्या इमारतीला मंजुरी देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर महापालिका आयुक्त सौरभराव यांनी महापालिका उपायुक्त (शिक्षण) संदीप सांगळे व नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांना जागेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या पाहणीवेळी मनोहर डुंबरे यांनी अधिकाऱ्यांना शाळेच्या इमारतीची गरज ध्यानात आणून दिली. या अधिकाऱ्यांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
महापालिकेच्या शाळेची पातलीपाडा येथे इमारत उभारण्यासाठी मंजूरी मिळून, लवकरच विद्यार्थ्यांना नव्या इमारतीत शिक्षण घेता येईल, असा विश्वास माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केला.