कल्याण: शुक्रवारी डोंबिवली निवासी विभागात प्रवास करणाऱ्या एका केडीएमटी बसमध्ये घडलेल्या घटनेत भरधाव वेगामुळे बसच्या दारात उभ्या असलेल्या एका महिला व तरुणीला जोराचा हिसका बसून त्या बसमधून रस्त्यावर फेकल्या गेल्या.
पाथर्ली शेलार नाका येथे बसने अचानक ब्रेक मारल्यानंतर हा अपघात घडला. यात एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. घटनेनंतर रस्त्यावरील पादचाऱ्यांनी ओरडा करत बस चालकाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर चालकाने बस थांबवली व त्या महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले.
केडीएमटीच्या बस वेळेवर न धावल्याने प्रवासी मिळेल ती खचाखच भरलेली बस पकडण्यास धावत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याची जबाबदारी चालक व वाहकांची असताना, अनेकदा गर्दी असतानाही भरधाव वेगाने बस चालवली जाते. अचानक ब्रेक मारल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मनमानी कारभारामुळे नव्या केडीएमटी बसही लवकरच भंगार होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.