ठामपाकडून नियंत्रणाचा दावा; पण ठाण्यात प्रदूषणाचीच ‘हवा’!

* प्रदूषण नियंत्रणासाठी २३९ कोटी
* बांधकाम कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
* २२० लो-कॉस्ट सेन्सर्स आणि १४ कॅमेरे

ठाणे: ठाणे शहरात रोज ३०० टन बांधकाम कचरा निर्माण होत असून त्याच्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या माध्यमातून कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केले जात असल्याचा दावा महापालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे तर विविध मार्गांनी होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी ठाणे शहरात वायू प्रदूषण गंभीर असल्याचेच आढळून येत आहे.

ठाणे महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी व्यापक मोहिम उभारली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात हवेच्या प्रदूषण नियंत्रणासाठी २३९.०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून विविध प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये बांधकाम व पाडकामातून निर्माण होणारा कचरा टाकणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी कांदळवन परिसरासह शहरातील संवेदनशील भागांमध्ये १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, शहरात ३०० टन प्रतिदिन क्षमतेचा बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असून, त्यामार्फत बांधकाम कचर्‍याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केले जात असल्याचा दावा केला जात आहे. हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने नजर ठेवण्यासाठी महापालिकेने २२० लो-कॉस्ट सेन्सर्स विविध भागांत बसविले आहेत. त्यासोबतच, प्रदूषण अधिक असलेल्या ३० हॉटस्पॉट्सपैकी काही ठिकाणी २५ सेन्सर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेन्सर्समधून मिळणारा डेटा संकलित करण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी तत्काळ तपासणे शक्य झाले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

या तांत्रिक उपाययोजनांची अंमलबजावणी करत असताना प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांचाही अभ्यास पालिकेने केला आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेली बांधकाम कामे, पुर्नविकासासाठी पाडण्यात येणारे बांधकाम, वाहनांची वर्दळ आणि कोंडी तसेच कचरा जाळण्याचे वाढते प्रकार वायूप्रदूषणासाठी मुख्य कारणीभूत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महापालिकेने ३५० नोटिसा बजावल्या आहेत. १ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत १८२ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यापैकी १२२ ठिकाणी कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या, तर ५९ ठिकाणी थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २८ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटनांवरही महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. १ एप्रिल २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत १० प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ३ प्रकरणांत १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणाचे उपाय न केल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १२४ बांधकाम स्थळांवर कारवाई करून ४३ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहिमेअंतर्गत १,३२३.२ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, ४ लाख ९४ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आरटीओ विभागाकडून ९४ कोंडीग्रस्त रस्त्यांचे वर्गिकरण करण्यात आले आहेत. त्यापैकी २६ प्रमुख रस्त्यांवर ग्स्त घालण्यात येत आहे. दरम्यान पीयुसी तपासणीत २४, १९३ अधिक वाहने दोषी आढळाी असून २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हरित पट्टा विकासाठी वर्षभरात एक लाख नऊ हजार झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये सात हजार बांबूंच्या झाडांचा समावेश आहे. मियावाकी पद्धतीने ८० हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. माजिवडा आणि विटावा या प्रमुख चौकांमध्ये धूळ नियंत्रणासाठी मिस्ट वॉटर फाऊंटन लावण्यात आले आहे. ७२७ रस्ते खड्डेमुक्त ठेवत त्यांची धुलाई सातत्याने होत असल्याचा दावा केला आहे. ४० पैकी आठ स्मशानभूमी एलपीजी, पीएनजी बसवण्यात आले असून ९ स्माशानभूमी पर्यावरण पुरक करण्यात येत आहेत. ११७ पैकी २७ बेकर्‍यांमध्ये गॅस व वीजेचा वापर करण्यात आला आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये प्रदूषणसंदर्भात वर्षभरात ४४ तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत केलेल्या कारवाईत सुमारे २ लाख २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

८ फेब्रुवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार, ठाणे शहरातील हवेचा दर्जा (एक्यूआय) सुमारे ३०४ (गंभीर श्रेणी) इतका नोंदवला गेला आहे, जो आरोग्यासाठी धोकादायक आहे. हवेतील सूक्ष्म धुलिकण (PM2.5) चे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ शकतात. या प्रदूषणासाठी वाहनांची गर्दी, बांधकामे आणि औद्योगिक क्रियाकलाप प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI): ३०४ (गंभीर) प्रमुख प्रदूषक (PM2.5): १३४-१३६ \(\mu g/m^{3}\) च्या दरम्यान (हे प्रमाण अत्यंत हानिकारक आहे).प्रदूषणाची मुख्य कारणे: मेट्रो प्रकल्प, रस्ते बांधकामे, वाढती वाहतूक कोंडी आणि कचरा जाळणे. परिणाम: श्वसनाचे विकार, दम्याच्या रुग्णांना त्रास आणि डोळ्यांची जळजळ.