किम्स हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या दोन हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

ठाणे: किम्स हॉस्पिटल्स, ठाणे यांनी कल्याण व शहापूर येथील अनुक्रमे ८० व ६० वर्षीय रुग्णांवरील गुंतागुंतीच्या व उच्च-जोखमीच्या हृदयविकाराच्या प्रकरणांवर यशस्वी उपचार करून गंभीर आजार व अनेक सहव्याधी असलेल्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यातील आपले वैद्यकीय कौशल्य सिद्ध केले आहे.

कल्याण येथील रहिवासी नामदेव देशमुख (८०) यांची सुरुवातीला दोन्ही गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तपासणी सुरू होती. शस्त्रक्रियेपूर्व हृदय तपासणीदरम्यान डॉक्टरांना एओर्टिक व्हॉल्वमध्ये गंभीर अरुंदता तसेच कोरोनरी धमन्यांमध्ये पाच गंभीर ब्लॉकेज आढळले, ज्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास असल्याने शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता.

या गुंतागुंतीच्या परिस्थितीत किम्स हॉस्पिटल्स येथील कार्डियाक सायन्सेस टीमने एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंटसोबत पाच कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट्सची संयुक्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम राहिली; आयसीयूमध्ये स्थिर स्थिती, दुसऱ्या दिवशी हालचाल सुरू झाली आणि अवघ्या पाच दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

शहापूर येथील वासुदेव हांबीर (६०) यांना १४ वर्षांपूर्वी छातीला झालेल्या दुखापतीमुळे दीर्घकालीन गुंतागुंत निर्माण झाली होती. मागील दोन वर्षांपासून त्यांना वाढता श्वास लागणे, पाय व पोट सुजणे तसेच दीर्घकाळ सूज राहिल्यामुळे जखमा (अल्सर) होण्याचा त्रास होत होता.
सविस्तर तपासणीत यकृत सिरोसिस, अ‍ॅसाइटिस, पोर्टल हायपरटेन्शन, स्प्लेनोमेगली, दोन्ही पायांतील व्हेरिकोज वेन्स तसेच अत्यंत कॅल्सिफाइड (“दगडासारखा कठीण”) पेरिकार्डियमसह कन्स्ट्रिक्टिव पेरिकार्डायटिस अशा अनेक गंभीर समस्या आढळल्या. या शस्त्रक्रियेत मृत्यूचा धोका सुमारे ५० टक्के इतका होता.

अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असूनही किम्स हॉस्पिटल्स येथील कार्डियाक सायन्सेस टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. रुग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, तिसऱ्या दिवशी चालण्यास सुरुवात झाली आणि सहाव्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले.