ऐरोलीत गोळीबार; दोघे गंभीर जखमी

नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली, सेक्टर-१ येथील ‘छत्रपती शिवाजी’ निवासी चाळीत रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. एका अज्ञात हल्लेखोराने दोन तरुणांवर अंदाधुंद गोळीबार केला असून यात दोघे जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री १२ च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळी आला आणि त्याने अमित मौर्य व संदीप गवस या दोन तरुणांना लक्ष्य करत चार गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अमित मौर्य गंभीर जखमी झाला असून, त्याच्या मानेला गोळी लागली आहे. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी ऐरोली येथील ‘इंद्रावती रुग्णालयात’ दाखल करण्यात आले; मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील प्रगत उपचारांसाठी मुलुंड येथील ‘फोर्टिस रुग्णालयात’ हलवण्यात आले.

घटनास्थळाची पाहणी केली असता, पोलिसांना तेथे चार रिकाम्या काडतुसांचे अवशेष आढळून आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक संशयित दुचाकीवरून येऊन गोळीबार करताना दिसून आला. रुग्णालयात पोलिसांनी विचारणा केली असता, जखमी अमित मौर्यने सध्या तरी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. याबाबत रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.