* १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी
* निवडणूक आचारसंहिता लागू
मुंबई: ठाणे, मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशो घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. श्री. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या २ नवनिर्मित महानगरपालिका आहेत. पाच महानगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली आहे. सर्वाधिक १८ महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती; तर चार महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली आहे.
ठाणे महापालिकेची ५ एप्रिल २०२२ रोजी मुदत संपली आहे. नवी मुंबई ७ मे २०२०, वसई-विरार २८ जून २०२०, कल्याण-डोंबिवली १० नोव्हेंबर २०२०, उल्हासनगर ४ एप्रिल २०२२, भिवंडी-निजामपूर ८ जून २०२२ आणि मीरा-भाईंदर महापालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार असून त्यासाठी सुमारे ३९ हजार १४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३,९५८ कंट्रोल युनिट आणि ८७,९१६ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी २० डिसेंबर २०२५ रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
चौकट
* नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: २३ ते ३० डिसेंबर २०२५
* नामनिर्देशनपत्रांची छाननी: ३१ डिसेंबर २०२५
* उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६
* निवडणूक चिन्हवाटप: ३ जानेवारी २०२६
* अंतिम उमेदवारांची यादी: ३ जानेवारी २०२६
* मतदानाचा दिनांक: १५ जानेवारी २०२६
* मतमोजणीचा दिनांक: १६ जानेवारी २०२६