बदलापूरकर समस्यांनी बेजार; तिजोरीवर सुशोभीकरणाचाच भार

१८५ कोटींच्या कामांमध्ये ४० कोटी रंगरंगोटीवर

ठाणे: कुळगाव-बदलापूरमध्ये समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा सेवा आणि अत्यावश्यक विकास अपेक्षित असताना २० मे रोजी होणाऱ्या जम्बो प्रस्तावांच्या महासभेत शहराच्या प्रश्नांपेक्षा ‘सजावटी’चेच सर्वाधिक प्रस्ताव असून तब्बल ४० कोटी रुपये केवळ सुशोभीकरणाच्या कामांवर खर्च करण्याचा घाट घालण्यात आला आहे.

नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ४६३ विषयांची जम्बो महासभा २० मे रोजी होणार आहे. तब्बल १८५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव यावेळी मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक होऊन पाच महिने झाले आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या महासभा या सत्तास्थापना, राजकीय वर्चस्व आदी मुद्द्यांनी गाजल्या. पण आता प्रशासकीय राजवटीनंतर नव्याने निवडून आलेले सत्ताधारी, नगराध्यक्ष आणि नगरसेवक ‘कामाला’ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासकामे रखडल्यामुळे त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी भरभरून प्रस्ताव सादर करण्याचा सपाटा लावला आहे. त्याची प्रचिती २० मे रोजी होणार्‍या महासभेत येणार आहे. या विशेष महासभेच्या विषय पत्रिकेत तब्बल ४६३ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात नियमित सात प्रस्ताव अशून आस्थापनाविषयक तीन प्रस्ताव आहेत. त्यानंतर ४७ प्रस्ताव हे प्रशासनाचे आहेत. मात्र या विषयांनंतर तब्बल ४०६ विषय हे सदस्यांचे आहेत. या सभेत सुमारे १८५ कोटींचे विषय चर्चिले जाणार आहेत. काही धोरणात्मक विषय आहेत. मात्र शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींची उधळपट्टी केली जाणार असल्याचे या विषय पत्रिकेतून स्पष्ट होत आहे.

बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत चौक सुशोभीकरण, कोपरा सुशोभीकरण, कमानी उभारणे, उद्यान सुशोभीकरणाच्या नावाखाली यापूर्वीच कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यातील अनेक चौक सुशोभीकरण केल्यानंतर रूंदीकरणात तोडण्यात आले. आधीच्या सुशोभीकरणाच्या कामांची स्थिती, त्याची दुरावस्था पाहता पुन्हा बदलापूरकरांच्या कराच्या पैशांचा चुराडा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महासभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषय पत्रिकेमध्ये काही कामांच्या नावात साम्य असल्याचे दिसून येत आहे. एकाच नावाचे दोन प्रस्ताव असून निधीत मात्र तफावत आहे. याशिवाय रस्त्यांचे शंभर टक्के काँक्रीटीकरण झाल्याचा दावा केला जात असतानाही प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी १० लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

बदलापूर नगरपरिषदेचा सुमारे १९६२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय बजेट असून, विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी राज्य शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरोत्थान योजना, डीपीडीसी आदी माध्यमांतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील संपूर्ण नियोजन आधीच करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. परदेशातील उच्च दर्जाच्या शहरांप्रमाणे दर्जेदार आणि सुबक रस्ते बदलापूरमध्ये उभे करण्याचा संकल्प प्रशासनाने केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.