पटेरी वाघसदृश्य कातडे, देशी पिस्टल, जिवंत राऊंड सापडले

ठाणे : वन्यजीव प्राणी पट्टेरी वाघसदृष कातडे, देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या दोन तस्करांच्या मुसक्या कल्याण येथील गुन्हे शाखा युनिट तीनने पिळल्या आहेत. कल्याणच्या वनपाल विभागाने कल्याण पोलिसांना यासाठी मदत केली आहे.

कल्याणचे पोलीस हवालदार /५३८९ दत्ताराम भोसले यांना २१ जानेवारी २४ रोजी डोंबिवलीत दोन तस्कर वन्यजीव प्राणी पट्टेरी वाघसदृष कातडे, देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार, कल्याण- शिळफाटा रस्त्यावरील क्लासिक हॉटेलच्या पार्किंगमध्ये पथकाने सापळा रचला. त्यात सिताराम नेरपगार (५१) जळगाव आणि ब्रिजलाल पावरा (२२) धुळे येथे सापडले

वाघसदृष वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले, कडक झालेले आणि विनापरवानाचे एक देशी पिस्टल, दोन जीवंत काडतुसे हे विक्रीसाठी आले होते. विक्री करण्यासाठी स्विफ्ट डिझायर कारमधून आले होते. त्यांच्याकडून डिझायर कारसह दोन मोबाईल फोन व आधारकार्ड असा एकूण ४५ लाख ५२ हजार किंमतींचा माल हस्तगत करण्यात आला.
त्यांनी पट्टेरी वाघाचे कातडे व देशी बनावटीचे पिस्टल कोणासाठी आणले होते, याची चौकशी सुरु आहे. आरोपींविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह-आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक तीनचे कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडू, विनोद चन्ने, कल्याण वन विभागाचे वनपाल राजूु शिंदे, वनरक्षक महादेव सावंत यांनी केली आहे.