हस्तक्षेप नसल्यामुळेच मुंबईचे अंडरवर्ल्ड झाले उद्ध्वस्त-शिवानंदन

ठाण्यात झाले पुस्तक प्रकाशन

सायबर गुन्ह्यांना ‘मोका’खाली आणावे-डुंबरे

ठाणे: ‘मुंबईची अंडरवर्ल्डच्या जाचातून सुटका करताना पोलिस दलाचा निर्धार जितका कारणीभूत होता, तितकेच त्यावेळच्या सरकारने आमच्या कामांत हस्तक्षेप न करताना दिलेले स्वातंत्र्य जबाबदार होते,’ असे उद्गार मुंबईचे तत्कालीन गुन्हे अन्वेषण विभागाचे सह-आयुक्त डी. शिवानंदन यांनी काढले.

राज्याचे माजी पोलिस महासंचालक असलेले डी. शिवानंदन यांनी ९०च्या दशकातील मुंबईत हैदोस घालणाऱ्या अंडरवर्ल्डचा कणा कसा मोडला यावर लिहिलेले ‘ब्रह्मास्त्र अनलिश्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी संध्याकाळी ठाण्यात झाले. यावेळी ठाण्याचे पोलिस आशुतोष डुंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सने आयोजित केलेल्या या समारंभात रोटरीचे प्रांतपाल हर्ष मकोल, क्लबचे अध्यक्ष समीर लिमये, सेक्रेटरी निलेश पितळे, सुजित गवई, माजी अध्यक्ष रंगनाथन, डॉ. सुहास कुलकर्णी, सुचेता रेगे आदी उपस्थित होते. डॉ. अनघा कारखानिस यांनी आभार मानले.

ठाण्याचे पोलिस आयुक्त श्री. डुंबरे यांनी डी. शिवानंदन यांच्या भरीव कामगिरीचे कौतुक करताना पोलिस खात्यात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले बदल आजही उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. संघटित गुन्हेगारीविरोधी ‘मोका’ कायदा त्यांच्या पुढाकारामुळेच अस्तित्वात आला असे ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांना वेसण घालण्यासाठी मोकामध्ये त्याचा समावेश करावा, असे श्री. डुंबरे यांनी सूचित केले.