एकाच दिवसांत कडोंमपाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या आरोग्य विभागातील दोन जणांना तसेच मलनिस्सारण विभागातील एकाला लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे.

घनकचरा विभागातील आरोग्य निरिक्षक वसंत देगलूरकर आणि सहकारी सुर्दशन जाधव या दोघांना आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर मलनिस्सारण विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे यांनी एका विकासकाला एनओसी देण्यासाठी 40 हजार रुपये लाच घेताना अटक केली. कल्याण डोंबिवली मनपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे 47 अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणी एसबीच्या जाळ्यात अडकले आहेत. गुरूवारी लाचलुचपत विभागाने लावलेल्या दोन सापळ्यात वेगवेगळ्या दोन विभागातील तीन जणांना अटक केल्याने मनपाचे पुरते वाभाडे निघाले आहेत.