जगातील सर्वात खडतर ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’साठी तिघे कल्याणकर सज्ज

डॉ. सोमनाथ बाभळे, डॉ. हरीश शहादपुरी आणि संजय काळुखे करणार प्रतिनिधित्व

कल्याण : जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी अल्ट्रामॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन २०२६’ मध्ये कल्याणमधील तीन धावपटू सहभागी होणार आहेत. डॉ. सोमनाथ बाभळे, डॉ. हरीश शहादपुरी आणि संजय कालुखे हे तिघेही दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

येत्या १४ जून २०२६ रोजी दक्षिण आफ्रिकेत होणारी ही स्पर्धा कॉम्रेड्स मॅरेथॉनची ९९ वी आवृत्ती आहे. जगभरातील हजारो धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. यंदाची शर्यत पारंपरिक ‘अप रन’ स्वरूपात पार पडणार असून डर्बन ते पिटरमारित्झबर्ग दरम्यानचे तब्बल ८५.७७ किलोमीटरचे अंतर धावपटूंना पूर्ण करावे लागणार आहे. यंदाच्या स्पर्धेची थीम “Ska Fela Moya” म्हणजेच “हार मानू नका” अशी असून विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठीच्या सर्व २२ हजार जागा अवघ्या दहा तासांत भरल्या गेल्याची माहिती डॉ. सोमनाथ बाभळे यांनी दिली. त्यामुळे या जागतिक स्तरावरील स्पर्धेची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा अधोरेखित होत आहे.

कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूंना कठोर पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. स्पर्धकाने पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) शर्यत ५ तासांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य असते. त्यानंतरच या अल्ट्रामॅरेथॉनसाठी पात्रता मिळते. या स्पर्धेतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे तिचा अत्यंत खडतर मार्ग हा आहे. डोंगराळ चढ-उतार, सलग अनेक तास धावणे, बदलणारे हवामान आणि शारीरिक-मानसिक सहनशक्तीची कठोर परीक्षा यामुळे कॉम्रेड्स मॅरेथॉनला जगातील धावण्याच्या सर्वांत कठीण स्पर्धांपैकी एक मानले जाते.

दरम्यान कल्याणचे डॉ. हरीश शहादपुरी हे चौथ्यांदा तर डॉ. सोमनाथ बाभळे आणि संजय काळुखे हे या प्रतिष्ठित स्पर्धेत तिसऱ्यांदा सहभागी होत आहेत. यापूर्वीही त्यांनी यशस्वीरित्या ही शर्यत पूर्ण करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. RUNAHOLICS या रनिंग ग्रुपअंतर्गत हे तिघेही धावपटू सराव करत असून डॉ. योगेश सातव यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत.

अनेक महिन्यांच्या कठोर सरावानंतर हे तिघेही धावपटू आता या जागतिक दर्जाच्या आव्हानासाठी सज्ज झाले असून त्यांच्या कामगिरीकडे कल्याणकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील धावपटूंचे लक्ष लागले आहे. कॉम्रेड्स मॅरेथॉनसारख्या जागतिक दर्जाच्या आणि अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत सातत्याने सहभाग नोंदवत कल्याणच्या या धावपटूंनी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले असल्याची भावना क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.