ठाणेकरांसाठी स्वतंत्र संग्रहालयाची मागणी; महापौरांना प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे निमंत्रण

ठाणे : भारतीय संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी गेली चार दशके कार्यरत असलेल्या प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे (Institute for Oriental Study, Thane) यांनी ठाणेकरांसाठी स्वतंत्र संग्रहालय उभारण्याच्या मागणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे.

संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. विजय बेडेकर यांनी १९८२ मध्ये या संस्थेची स्थापना केली. भारतीय संस्कृतीचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने संस्था विविध संशोधन परिषदा, कार्यशाळा, कला, स्थापत्य आणि इतिहास विषयक प्रदर्शने, छायाचित्र प्रदर्शने, माहितीपट तसेच शैक्षणिक दौऱ्यांचे आयोजन करत असते.

संस्थेकडे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा मोठा ठेवा जतन करण्यात आला असून त्यामध्ये सुमारे ५०० प्राचीन नाणी, रायगडाचे नाव बदलून ‘ इस्लामगड’ केल्याचा औरंगजेबाचा मूळ शिलालेख, ३ हजार ८०० दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्या, मराठा कालखंडातील शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक लघुचित्रे, ४०० विविध कलाकृती, ८० हजारांहून अधिक दुर्मिळ संदर्भग्रंथ तसेच ब्रिटिशकालीन कंपनी आर्ट पेंटिंग्ज यांचा समावेश आहे.

ठाण्यासारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात नागरिकांसाठी हक्काचे संग्रहालय असावे, अशी संस्थेची अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी संस्थेला भेट देऊन संग्रहालयातील दुर्मिळ संग्रहाची पाहणी करावी आणि संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घ्यावी, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या महापालिकेच्या शाहू मार्केटमधे संस्थेचे कार्यालय होते जे आता ठाण्यातील हाजूरी भागात असलेल्या नवीन कार्यालयात नेण्यात आले. महापालिकेकडून ३ मजल्यांची इमारत संस्थेसाठी देण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर संस्थेचे कार्यालय आणि ग्रंथालय असून संस्थेचा कारभार पाहणारा कर्मचारी वर्ग येथे सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते ५ या वेळेत अभ्यासकांच्या सेवेसाठी तत्पर असतो. इतिहास, पुरातत्व, प्राचीन कालखंडातील स्थापत्यशास्त्र, पुराभिलेखशास्त्र, नाणकशास्त्र, मूर्तिविज्ञान, मंदिरे, लेण्या, किल्ले, संस्कृत भाषा अशा विविध विषयांवरील अनेक उत्तमोत्तम, दुर्मिळ आणि अत्यंत महाग असे संदर्भ ग्रंथ येथे अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेत अभ्यासाची आवड असलेल्या कोणालाही मुक्त प्रवेश उपलब्ध आहे. संस्थेतर्फे अनेकविविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचा मुख्य उद्देश हा इतिहास आणि संस्कृतीचा प्रसार हा असल्याने संस्थेतर्फे अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पुरातत्व विषयाचा एक वर्षाचा ऑनलाईन अभ्यासक्रम हा त्यापैकीच एक. अभ्यासक्रम जरी ऑनलाईन असला तरी पुरातत्व हा विषय असा आहे ज्यामध्ये काही गोष्टी प्रतिक्षकांच्या माध्यमातूनच शिकाव्या लागतात. या गोष्टींसाठी संस्था विविध कार्यशाळांचे आयोजन करते, ज्यात प्रत्यक्ष पुरातत्वीय उत्खननाचे तंत्र, अश्मयुगीन मानवाची हत्यारे बनवण्याचे तंत्र, खापरे बनवण्याच्या पद्धती अशा विविध कार्यशाळांचा समावेश आहे. पुरातत्व प्रमाणपत्र वर्गास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपुरत्या या कार्यशाळा मर्यादित ठेवल्या नसून विषयाची आवड असलेल्या कोणालाही नाममात्र शुल्क भरून या कार्यशाळांमध्ये सहभाग घेता येतो.