विचारांना मर्यादा नकोत, आनंदालाच यश समजा

‘दृष्टी २०२५’ कार्यक्रमात भरत दाभोळकर यांचे प्रतिपादन

वावीकर आय इन्स्टिट्यूट व ठाणेवैभव यांचा संयुक्त उपक्रम

ठाणे: ‘तुमच्या विचारांना कधीही मर्यादा घालू नका. जे मनापासून वाटेल ते करत राहा, केवळ यशस्वी होणे महत्त्वाचे नाही, तर आनंदी असणे अधिक गरजेचे आहे. तुम्ही जे करता त्यात आनंद मिळत असेल, तर तुम्ही आपोआप यशस्वी होता, असा विश्वास सुप्रसिद्ध अभिनेते व जाहिरात क्षेत्रातील दिग्गज भरत दाभोळकर यांनी व्यक्त केला.

वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला‘दृष्टी २०२५’ हा भव्य दिव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी.श्री. दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशाचे गमक उलगडून दाखवले.

आपल्या प्रवासाविषयी बोलताना दाभोळकर म्हणाले की, त्यांनी शाळा किंवा कॉलेजमध्ये कधीही नाटक केले नव्हते. मात्र जाहिरात क्षेत्रात काम करत असताना मिळालेल्या एका संधीमुळे त्यांनी नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जवळपास ३५ नाटकांमध्ये त्यांनी काम केले. “आयुष्यात अनपेक्षित संधी मिळतात, त्या स्वीकारल्या तरच नवे मार्ग खुलतात,” असे त्यांनी नमूद केले.

जाहिरात क्षेत्राविषयी बोलताना दाभोळकर म्हणाले की, जाहिरात म्हणजे फक्त क्रिएटिव्हिटी नव्हे. प्लॅनिंग, सर्व्हिस, रिसर्च आणि एक्झिक्युशन अशा अनेक घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून जाहिरात पूर्ण होते. गणितात हुशार असलेले विद्यार्थीही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मात्र जाहिरात क्षेत्र हे ९ ते ५ या वेळेत बांधलेल्या नोकरीचे नसून, त्यासाठी सातत्याने विचार आणि मेहनत आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयुष्यात येणाऱ्या अपयशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येकाला नकारांचा सामना करावा लागतो. मी स्वतःही अनेक रिजेक्शन अनुभवले आहेत. काहीही झाले तरी चेहऱ्यावरचे हसू टिकवून ठेवणे आणि काम करत राहणे महत्त्वाचे आहे,” असा सकारात्मक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भाषेच्या मर्यादांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जाहिरात क्षेत्रात कोणत्याही भाषेचे बंधन नसते. व्यक्त होणे महत्त्वाचे असते, भाषा दुय्यम असते. एलआयसीसाठी त्यांनी १४ भाषांमध्ये जाहिराती केल्याचे उदाहरण देत, अनेक भाषा न येताही प्रभावी काम करता येते, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मीडिया हा लोकांची मते जाणून घेण्यासाठी आणि जाहिरात क्षेत्रात मदतनीस म्हणून महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात जाहिरातीत वेगळेपणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, आपले उत्पादन इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. नाविन्य आणि वेगळा दृष्टिकोन हेच जाहिरातीचे खरे बलस्थान आहे.

शेवटी विद्यार्थ्यांना संदेश देताना भरत दाभोळकर म्हणाले, “आयुष्यात आनंदी राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे आवडते ते करण्यासाठी कधीही लाजू नका. तुम्ही जे करत आहात त्यात आनंद असेल, तर यश तुमच्याकडे नक्कीच चालून येईल.”

या कार्यक्रमाला वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.