ठाण्यातील पहिला प्रयोग
ठाणे : कळव्यामध्ये विविध कलांसह संगीत क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ देणारे संगीत उद्यान उभारण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अशा प्रकारचे हे पहिले उद्यान आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या संकल्पनेतून आणि प्रमिला केणी यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारण्यात आले आहे. रसिक कळवावासियांसाठी ही एक अनोखी भेट ठरणार आहे.
संगीत उद्यानात आर्ट गॅलरी, चित्र प्रदर्शन, स्टँडअप कॉमेडी, नृत्य सराव, अभिनय, पथनाट्य सराव आदींसह इतर कार्यक्रमांसाठी देखील एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमिला केणी यांच्या प्रयत्नाने या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
दोन ठिकाणी अॅम्पी थिएटर आणि योगासाठी देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. दोन सुरक्षारक्षक उपलब्ध असणार आहेत. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत.