महसूल आणि प्रदूषण विभागासह मनपाचे दुर्लक्ष
भिवंडी: भिवंडी तालुक्यातून वाहणाऱ्या कामवारी नदीचे पाणी काही दिवसांपासून पिवळे झाले असून आजूबाजूच्या डाईंगमधून केमिकलचे पाणी नदीच्या पाण्यात सोडल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
शहराच्या दक्षिणेला भिवंडी-वाडा मार्गावर वाहणारी कामवारी नदी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावातून शहराच्या सीमेवर आली आहे. ही नदी पुढे खाडीला मिळते. ग्रामीण शेतकऱ्यांना शेतीसाठी या नदीचे पाणी मिळावे म्हणून शहराच्या सीमेवर धरण बांधून नदीचे पाणी अडविले आहे. शहर जवळ असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीच्या शुद्ध पाण्याकडे अनेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी विभागाचे कार्यालय व पंचायत समितीमध्ये स्वतंत्र पाटबंधारे विभाग असताना बारमाही पीक घेण्यासाठी नदीचे पाणी अडविण्यासाठी कोणीही फारसे प्रयत्न केले नाहीत. परिणामी दरवर्षी पावसाचे पाणी भिवंडी-वाडा मार्गावर बांधलेल्या धरणांमधून उलटून खाडीच्या पाण्यात मिसळून जात आहे. त्यामुळे पुढे हे पाणी पुढील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपयोगी पडत नाही.
भिवंडी-वाडा मार्गावर शहराच्या सीमेपलीकडे असलेल्या शेलार गावात मोठ्या संख्येने कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कारखाने असून त्यामधून निघणारे केमिकलमिश्रित सांडपाणी नदीच्या व खाडीच्या पाण्यात सोडले जाते. त्यामुळे कामवारी नदीतून वाहणारे पाणी पिवळे झाले आहे. वास्तविक केमिकलयुक्त पाणी नदीच्या अथवा खाडीच्या पात्रात सोडण्यास बंदी आहे. असे असताना राजरोसपणे हे केमिकलचा पाणी नदीच्या आणि खाडीच्या पात्रात सोडले जात आहे.
नदी आणि खाडीलगत असलेल्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण झाले असून त्यामधून निघणारे पाणी देखील नदी आणि खाडीच्या पात्रात सोडले जात आहे. या बाबत नागरिकांनी आणि विविध संस्थांनी गेल्या पाच वर्षांपासून तहसील व प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि भिवंडी महानगरपालिका येथे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, कल्याण कार्यालय या ठिकाणी देखील तक्रारी केल्या आहेत. मात्र या सर्व कार्यालयातून तात्पुरता कागदी घोडे नाचविले जात असून गेल्या दहा वर्षांपासून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
कामवारी नदीच्या पाण्यामध्ये दरवर्षी शहरातील हजारोच्या संख्येने गणपतीच्या मूर्ती विसर्जित केल्या जात आहेत. त्यामुळे शहरालगतच्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ देखील साचला आहे. खाडीत देखील मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रदूषण वाढले आहे. या केमिकलयुक्त गाळाची उन्हाळ्यात धूप होऊन परिसरात दुर्गंधी पसरून येथील हवा आणि वातावरण प्रदूषित होऊन नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.