ठाणे: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणार्या ठाणे मेट्रो प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत झालेली मेट्रोची ट्रायल रन, उद्घाटनाच्या घोषणा आणि वेळोवेळी बदलणार्या डेडलाईन्स यामुळे ठाणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
एकीकडे सरकारकडून मेट्रो प्रकल्प वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी दुसरीकडे प्रत्यक्षात स्थानकांची अपूर्ण कामे, कारशेडचा रखडलेला प्रश्न आणि धुळखात असलेला ट्रायल रनचा डबा यामुळे ‘मेट्रो कधी धावणार?’ हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गायमुख ते कासारवडवली दरम्यान मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. ठाणे महापालिका निवडणूक तोंंडावर असल्याने त्यावेळी हा प्रकल्प वेगाने मार्गी लागत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र, ज्या डब्यातून ही चाचणी घेण्यात आली तोच डबा आज प्रकल्प परिसरात धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे.
वास्तवित ट्रायल रनच्यावेळी सुरुवातीला डिसेंबर २०२५ पर्यंत कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा मेट्रो प्रवास सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे निदान ठाण्यातल्या ठाण्यात मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न ठाणेकरांनी रंगवले. पण त्यानंतर मार्च २०२६ ची नवी डेडलाईन देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आता २०२६ च्या अखेरीपर्यंत तरी हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होईल का, याबाबतच शंका व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गायमुख ते कापूरबावडी हा भाग ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानंतर कापूरबावडी ते गांधीनगर (कांजूरमार्ग) हा दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण वडाळा ते गायमुख मार्ग २०२७ पर्यंत कार्यान्वित होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण मेट्रोच्या मार्गावर अनेक ठिकाणी उभारण्यात येणार्या स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे मोघरपाडा कारशेड. मेट्रोच्या देखभाल, पार्किंग आणि तांत्रिक संचालनासाठी कारशेड अत्यावश्यक मानले जाते. मात्र या कारशेडचे काम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने, मेट्रोची नियमित सेवा सुरू करण्यात मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, ‘ट्रायल रन हा केवळ प्रतीकात्मक टप्पा असतो. प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यासाठी स्थानके, सिग्नल यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि कारशेड यांची साखळी पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक असते.’ ही सर्वच कामे अपूर्ण असल्याने २०२६ च्या अखेरपर्यंत ठाणेकरांना मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चौकट
काही ठिकाणी केवळ संरचना उभारण्यात आली असून, एस्कलेटर, प्लॅटफॉर्म, विद्युत यंत्रणा आणि प्रवेशमार्गांची कामे अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे ट्रॅक तयार झाला तरी प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत तयारी अपुरी असल्याचे दिसून येत आहे.