वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणही चिंताजनक
राजेश जागर/शहापूर
तालुक्यातील धसई वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
धसई वनपरिक्षेत्रातील साजिवली, सारंगपुरी तसेच दुर्गम आदिवासी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराकडे संबंधित वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमधून केला जात आहे.
धसई वनपरिक्षेत्रात तब्बल १२,५०० हेक्टर राखीव वनक्षेत्र असून या भागात विविध प्रकारची मौल्यवान वनसंपदा, औषधी वनस्पती आणि जैवविविधता आढळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जंगल परिसरात दिवसा व रात्रीच्या वेळी अवैधरित्या वृक्षतोड सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही ठिकाणी मोठमोठी झाडे तोडून त्याची वाहतूकही होत असल्याची चर्चा असून यामुळे वनसंपदेची झपाट्याने हानी होत आहे.
याचबरोबर किन्हवली, खुटघर, नडगाव भागात वन विभागाच्या जागांवर अतिक्रमणाचे प्रमाणही वाढत चालले आहे. तथापि धसई वनपरिक्षेत्रातील किन्हवली, साजिवली, खुटघर, हिव, अंदाड, चिखलगाव आदी परिसरात वन वणव्याची भीषण घटना घडून सुमारे शेकडो हेक्टर राखीव वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. या आगीत अनेक दुर्मिळ पशू-पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला असून वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाचे अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे. परिणामी काही भागात वन विभागाची जागा साफ करून शेती, शेड किंवा अन्य बांधकामे उभारली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. वनक्षेत्रात वाढणाऱ्या या अतिक्रमणांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला असून भविष्यात मानव व वन्यजीव यांचा संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पर्यावरणप्रेमींनी या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जंगलातील बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी नियमित गस्त, ड्रोनद्वारे पाहणी आणि वनमाफियांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता व्यक्त होत असतांना येथील अधिकारी हातावर हात देऊन बसल्याचे दिसत आहे. दरम्यान वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि बदलते हवामान या संकटांच्या पार्श्वभूमीवर जंगलांचे संरक्षण अत्यंत गरजेचे असतांना धसई वनपरिक्षेत्रात सुरू असलेली अवैध वृक्षतोड, वन वणवे आणि वन जागेवरील अतिक्रमण चिंताजनक असून या प्रकारणांची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.