ठाणे: मागील विधानसभा निवडणुकीत अफरातफर झाल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाने नुकत्याच तुर्भे येथे झालेल्या मतदान यंत्र आणि प्रक्रियेच्या तपासणीनंतरही त्यांचे आक्षेप कायम ठेवले आहेत तर निवडणूक आयोगाने प्रक्रिया पारदर्शक झाल्याचे सांगून आरोप फेटाळून लावले आहेत.
२०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार १९ जुलै रोजी नवी मुंबई तुर्भे येथे ठाणे विधानसभा मतदानाची फेर तपासणी करण्यात आली. मात्र ही तपासणी म्हणजे लपवाछपवी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केला होता. हे वृत्त प्रसिद्ध होताच दुसर्या दिवशी ठाणे जिल्हा कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. यामध्ये मतमोजणीसाठी संबंधितांना पर्याय दिले होते. त्यांच्या संमतीने सर्व प्रक्रीया पार पडली असून ती पारदर्शक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी समाधानकारक झाल्याचे म्हटले आहे. यावरच ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
ठाकरे गटाच्या दाव्यानुसार निवडणूक आयोगाने नव्याने बनवलेल्या एसओपीनुसार ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी व पडताळणी करताना तांत्रिक प्रक्रीया कशी असणार याचे कोणतेही प्रात्यक्षित संबंधित प्रतिनिधींना देण्यात आले नव्हते. यासंदर्भात लेखी माहिती देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र फेरतपासणीच्या दोन दिवसांपूर्वी निवडणूक अधिकार्यांना देण्यात आले होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे फेर तपासणी करताना ईव्हीएममधील डेटा डिलीट होईल या भीतीने अधिकार्यांच्याच सांगण्यानुसार डायग्नॉस्टीक चेकींग हा पर्याय निवडण्यात आला असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
मतदानाची फेर तपासणी निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या अभियंत्याद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या आक्षेपानुसार कुणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवण्यात आले. पण मॉक पोल हा पर्याय निवडल्यास केंद्रावरील सीयूमधील संपूण निकाल दाखवण्यात येतो. तर डायगनॉस्टिक पर्यायामध्ये मशीनमधील एकूण मतदान दाखवण्यात येते. त्यामुळे संबंधित प्रतिनिधींनी निवडलेल्या पर्यायानुसार मतमोजणी करण्यात आली आहे.