* भातसाचे पाचही दरवाजे उघडले
* पाण्याचा ९१ क्यूसेक्स विसर्ग सुरू
* धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा
* तानसा धरणही झाले ओव्हर फ्लो
शहापूर: मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दोन दरवाजे आणि दुपारी ३ वाजता तीन दरवाजे उघडण्यात आले. संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी तालुक्यातील तानसा धरणही ओव्हर फ्लो झाल्याचे सांगण्यात आले.
भातसा धरणाची पातळी १३८.११ मीटर झाल्याने तसेच धरण क्षेत्रात पावसाच्या पाण्याचे येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत होते. हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवल्याने धरणसाठा नियमित ठेवण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांनी सांगितले.
भातसा धरणाच्या जल व लाभ क्षेत्रात पडणा-या पावसाचे प्रमाण सध्या वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा साठा वाढला आहे. धरणातील साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी भातसा धरणाचे तीन गेट ०.२५ सेंटीमीटरने उघडल्याने ९१ क्यूसेक्स एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील ग्रामपंचायत हद्दीमधील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत आणि या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी.पवार यांनी सांगितले.
शहापूर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून तालुक्यातील मोडकसागर यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून तानसा धरणही ९८ टक्के भरले आहे. मुंबईकरिता वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा भातसा धरणात पूर्ण झाला असल्याने मुंबईकरांचे पाण्याची चिंता दूर झाली आहे. धरणातील पाण्याचा साठा वाढून धरण ओव्हरफ्लो होऊ नये व धरणालगतच्या गावांना पुराचा फटका बसू नये यासाठी २३ जुलै रोजी भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी. पवार यांनी सांगितले. दरम्यान भातसा धरणाचे दोन दरवाजे २३ जुलैला प्रथम सकाळी १० वाजता धरणाची विधिवत पूजा-अर्चा करून ०.२५ सेंटीमीटरने उघडण्यात आले.
तानसा धरणही ओव्हर फ्लो
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. सध्या धरणातील पाण्याचा विसर्ग २२१० क्यूसेक्सप्रमाणे आहे. तर मोडकसागर ३९५६ क्यूसेक्स आणि मध्य वैतरणामधून पाण्याचा विसर्ग २११९ क्यूसेक्स एवढा होत आहे.