कळवा पूर्व ते महागिरी बससेवा सुरू
ठाणे: कळवा पूर्वेतील पौंड पाडा येथील विद्यार्थ्यांना महागीरी येथील उर्दू शाळेत येण्यासाठी खारीगाव येथे चालत यावे लागत होते, मात्र आता परिवहन समिती सदस्य शमीम खान यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे परिवहन सेवेने कळवा पूर्व ते महागिरी अशी थेट बससेवा सुरू केली आहे.
कळवा पूर्वमधील पौंड पाडा भागातून अनेक विद्यार्थी महागिरी येथील अंजुमन खैरुल इस्लाम हायस्कूल आणि ठाण्यातील शाळांमध्ये जातात. सकाळी बससेवा नसल्याने त्यांना पौंडपाडा येथून खारीगावपर्यंत चालत येऊन तेथून बस पकडावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक प्राणायाम करावा लागत होता आणि आर्थिक नुकसानही होत होते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय अंजुमन खैरूल इस्लाम शाळेच्या शिक्षकांनी परिवहन समिती सदस्य शमीम खान यांच्या निदर्शनास आणून दिली.
शमीम खान यांनी परिवहन प्रशासनाकडे पौंडपाडा ते महागिरी अशी थेट बससेवा सुरू करण्याची मागणी करून याबाबत पाठपुरावा सुरू केला. अखेर २० जुलैपासून ही बससेवा सकाळी सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानुसार घोलाई नगर ते कळवा रेल्वे स्थानक पूर्व या मार्गावर सोमवार ते गुरुवार आणि शनिवार या दिवशी पौंडपाडा ते चेंदणी कोळीवाडा (महागिरी) या मार्गावर सकाळी ७.१० वाजता आणि चेंदणी कोळीवाडा ते पौंडपाडा या मार्गावर १२.३२ वाजता तसेच फक्त शुक्रवारी पौंडपाडा ते चेंदणी कोळीवाडा या मार्गावर ७.१० वाजता आणि चेंदणी कोळीवाडा ते पौंडपाडा या मार्गावर ११ वाजता बसफेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ही विशेष बससेवा सुरू झाल्याने अंजुमन खैरुल इस्लाम शाळेच्या शिक्षकांनी, विद्यार्थी आणि पालकांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शमीम खान यांचे आभार मानले आहेत.