ठाण्यात लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी २५ कोटी

* आ. प्रताप सरनाईक यांची संकल्पना
* ऑगस्टमध्ये कामाला सुरुवात

ठाणे: गानकोकिळा लता दिंदीचे स्मरण कायम होत राहावे तसेच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणून ठाण्यातील वर्तकनगर येथील रेप्टाकोस ब्रेट कंपनीच्या सुविधा भुखंडावर भारतरत्न स्व. लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) सरकारच्या माध्यमातून विकसित होत आहे. राज्य सरकारने या कामी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ऑगस्टपासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मार्च २०२२ मध्ये आ. सरनाईक यांनी विद्यालय उभरणीबाबत आणि आवश्यक निधीची मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर संगीत विद्यालयाच्या कामास राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून हे काम महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. या कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे, असे आ. सरनाईक यांनी सांगितले.

ठाणे शहरामध्ये अनेक कलावंत राहत असल्यामुळे ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लता मंगेशकर संगीत विद्यालय निर्माण करून ते राज्य शासनाच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करण्यात येणार असल्यामुळे त्याचा फायदा ठाणे शहरातील उदयोन्मुख गायकांना होईल. या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून नवे संगीतकार निर्माण होतील. येथे रितसर संगीत अभ्यासक्रम शिकवला जाईल. या संगीत विद्यालयातून संगीत विद्येचा अभ्यासक्रम सुरु करून ते मुंबईत प्रस्तावित असलेल्या संगीत विद्यापीठाशी संलग्न केल्यामुळे ठाणे शहराच्या संगीत विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत संगीत विषयाची पदवी प्राप्त होईल. यातून नवे गायक, गायिका, कलाकार घडतील. यासाठी हे ठाणे शहरामध्ये संगीत विद्यालय होणे खूप गरजेचे आहे, असे श्री सरनाईक म्हणाले.