ठाणे: दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरूवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आला. यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले.
ढोल-ताशांच्या गजरात मिठाई वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता. इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचे काम नोयडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार हे करीत आहेत. ब्राँझ धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे.
या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग आज ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन स्वागत केले. याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच, गाडीचा चालक आणि त्याचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भास्कर आरकडे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, राजकुमार माळवी, सुभाष अहिरे, विमल शरणागत, विमल सातपुते, विनोद भालेराव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.