चार महिन्यात ६२१ मलेरियाचे तर डेंग्यूचे ४०५ डेंग्यू रुग्ण आढळले
ठाणे: पावसामुळे डासांचा उद्रेक वाढला असून ठाण्यात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये डेंग्यूचे ४०५ रुग्ण व मलेरियाचे ६२१ रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांसाठी रामबाण उपाय असलेल्या ड्रॅगन फ्रुट, किवी अशा विदेशी फळांसह स्वदेशी पपया व पपयाचा पाला यांची मागणी वाढल्याने त्यांचे दरही चांगलेच चढले आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून गेल्या चार महिन्यांमध्ये डेंग्यूचे ४०५ रुग्ण व मलेरियाचे ६२१ रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे २४३ रुग्ण आढळले असून जुलै महिन्यात १५६ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये डेंग्यूचे ६७ रुग्ण व मलेरियाचे १९१ रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यू व मलेरियाच्या आजारांमध्ये रुग्णांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स झपाट्याने कमी होत असतात. यामुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या आजारांवर उपाय म्हणून डॉक्टर किवी, ड्रॅगन फ्रुट, पपया व पपयाचा पाला खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सध्या ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत या फळांना अधिक मागणी आहे. बाजारपेठेत या फळांची आवक वाढल्याने हे फळ मुबलक उपलब्ध असल्याने रुग्णांना जास्त धावपळ करावी लागत नाही, असे फळ विक्रेते धीरज गुप्ता यांनी सांगितले.
आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे, पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवाव्या प्लास्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करणे, गटार, नाल्यांची नियमित सफाई, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत, डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरणे, डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.
गुणकारी फळांचे दर
विदेशी ड्रॅगन फ्रुट (चायनीज): ७० ते ८० रुपये नग, स्वदेशी ड्रॅगन फ्रुट: ५० ते ६० रुपये नग, पपई: ७० ते ८० रुपये नग, किवी: १२० रु. पॅकेट ३ नग, ३०० रु. ५ नग
ठाण्यातील चार महिन्यांतील मलेरिया रुग्णसंख्या
जून: ९१, जुलै: ९६, ऑगस्ट: २४३, सप्टेंबर: १९१
ठाण्यातील चार महिन्यांतील डेंग्यू रुग्णसंख्या.
जून: ८५, जुलै: १५६, ऑगस्ट: ९७ सप्टेंबर: ६७