६५ टक्के सरासरी पूर्ण
ठाणे: जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या अवघा २७.५ टक्के पाऊस पडल्याने मोठी तूट निर्माण झाली होती. मात्र जुलैमध्ये चित्र पूर्णपणे बदलले असून, अवघ्या २४ दिवसांतच महिन्याच्या सरासरीच्या दुपटीहून अधिक पाऊस बरसला आहे. त्यामुळे जूनमध्ये निर्माण झालेली पावसाची तूट केवळ भरून निघाली नसून, जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३४.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
यंदा जून महिन्यात ठाणे जिल्ह्यात पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी लावली नव्हती. जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी ४६१.९ मि.मी. असताना प्रत्यक्षात केवळ १२६.८ मि.मी. पाऊस झाला. हे प्रमाण जूनच्या सरासरीच्या अवघे २७.५ टक्के होते. विशेषतः अंबरनाथमध्ये सरासरीच्या १७.८ टक्के, शहापूरमध्ये १७.९ टक्के आणि कल्याणमध्ये २०.५ टक्केच पाऊस झाल्याने पावसाची तूट प्रकर्षाने जाणवत होती. ठाणे तालुक्यात तुलनेने सर्वाधिक ४३.४ टक्के पाऊस झाला असला, तरी जिल्ह्यातील एकाही तालुक्याला जूनची सरासरी गाठता आली नव्हती.
जूनमधील या निराशाजनक परिस्थितीनंतर जुलैमध्ये मात्र पावसाने अक्षरशः कसर भरून काढली. ठाणे जिल्ह्याची जुलै महिन्याची सरासरी ७२९.५ मि.मी. आहे. त्याच्या तुलनेत २४ जुलैपर्यंतच तब्बल १४७०.७ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला आहे. म्हणजेच महिन्याचे आणखी सात दिवस शिल्लक असतानाच जुलैच्या सरासरीच्या २०१.६ टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये सरासरीच्या एक चतुर्थांशाच्या आसपास राहिलेला पाऊस जुलैमध्ये थेट दुप्पट झाल्याने जिल्ह्यातील पावसाची एकूण आकडेवारी झपाट्याने वाढली आहे.
जुलैमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांनी आपापली मासिक सरासरी ओलांडली आहे. त्यात अंबरनाथमध्ये सर्वाधिक २८४.६ टक्के पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये २२८.५ टक्के, भिवंडीत २२५ टक्के आणि ठाण्यात २०८.२ टक्के पाऊस झाला. मुरबाडमध्ये १९६.२ टक्के, शहापूरमध्ये १९४.२ टक्के, तर कल्याणमध्येही १८४.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.