डोंबिवली: आपण बनावट सीम कार्ड घेतले आहे. त्या माध्यमातून काही कोटीचे व्यवहार झाले असून त्यामधील काही पैसे आपणास मिळाले आहेत. आपण महिलांना लघुसंदेश पाठवले आहेत. आपल्या विरूध्द आमच्याकडे गुन्हे दाखल आहेत. आपण तातडीने याप्रकरणातून वाचविण्यासाठी आम्ही सांगू त्या बँक खात्यावर पैसे पाठवा आणि अन्यथा आम्ही तुम्हाला घरी येऊन अटक करू, अशी धमकी देऊन भामट्यांनी डोंबिवलीतील दोन सेवानिवृत्त वृध्दांची एकूण ३५ लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
नोकरी करून जमा केलेली आयुष्यांची पुंजी भामट्यांनी आपल्याकडून बनवेगिरी करून काढुन घेतल्याचे समजल्यावर या दोन्ही वृध्दांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मोहन चव्हाण (७४) असे फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील भोईर जीमखाना शेजारी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ते हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. फसवणूक झालेल्या दुसऱ्या गृहस्थांचे नाव संजय पंडित (७०) आहे. ते मुरबाड येथील लाॅईड स्टील कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते डोंबिवली पश्चिमेतील देवी चौक शास्त्रीनगर भागात कुटुंबीयांसह राहतात.