तीन मतदारसंघांसाठी पहिल्या दिवशी १३४ अर्जांची विक्री

कल्याणात दोन उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे : महाराष्ट्रातील लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीची लगबग सुरु झाली असून जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांकरिता १३४ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले आहेत तर कल्याण लोकसभा मतदार संघाकरिता दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून विविध पक्षांच्या उमेदवारांच्या 25 प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यंत एकूण 43 नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यात भारतीय राजनिती विकास पार्टी 1, आम आदमी पार्टी 1, अपक्ष 19, भूमीपुत्र पार्टी 1, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 2, बहुजन शक्ती 1, संयुक्त भारत पक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 4, हिंदुस्थान मानव पक्ष 1, रिपब्लिकन बहुजन सेना 2, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक 3, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी 2, बहुजन मुक्ती पार्टी 2, भारतीय जवान किसन पार्टी 2 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष १६, लोकराज्य पार्टी १, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) ४, राईट टू रिकॉल पार्टी १, राष्ट्रीय किसान बहुजन एसपार्टी १, दलित पँथर २, शिवसेना ४, बहुजन मुक्ती पार्टी १, पीपल पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) ४ आणि बहुजन समाज पार्टी ३ अशा १९ जणांनी ३७ नामनिर्देशनपत्र घेतले आहेत. यातील काशिनाथ कांबळे, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) आणि अमित उपाध्याय, राईट टू रिकॉल पार्टी या दोघांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष 3, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 7, धनवान भारत पार्टी 1, संयुक्त भारत पक्ष 1, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी 4, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) 5, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया 3, बहुजन समाजवादी पार्टी 2, लोकराज्य पार्टी 2, अपक्ष 26 अशा एकूण २५ जणांनी 54 नामनिर्देशनपत्रे घेऊन गेले आहेत.

भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), महायुतीचे उमदेवार कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र असतानाच, पहिल्याच दिवशी तब्बल २५ उमेदवारांनी ५४ नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत. यात काँग्रेस उमेदवारांचा समावेश असल्याने महाविकास आघडीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या मतदारसंघात उमदेवारांची संख्या जास्त असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने कपिल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवले आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला गेली असून यामुळे या जागेसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. यातूनच म्हाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्ते अद्याप उतरलेले नाहीत. काँग्रेसचे काही पदाधिकारी अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच पहिल्याच दिवशी तब्बल ५४ नामनिर्देशन अर्जाचे वितरण झाले आहे.