ठाण्यात राज ठाकरे यांचा भाजपा-शिंदे गटाला टोला
ठाणे: सध्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू असून सत्तेच्या जोरावर विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. आणीबाणीच्या काळापासून आजपर्यंत विरोधकांना संपविण्याचे राजकारण फार काळ टिकलेले नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.
बुधवारी ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित ‘पदाधिकारी सुसंवाद’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आणीबाणीच्या काळापासून ते आजपर्यंत विरोधकांना संपविण्याचे राजकारण फार काळ टिकलेले नाही. बाहेरील विरोधक संपल्यानंतर सत्ताधारी पक्षातच अंतर्गत संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे विरोधकांना लक्ष्य करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील वाढत्या असंतोषाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.
लोक मतदान करून लोकप्रतिनिधी निवडतात; मात्र नंतर निवडून आलेले लोक पक्ष बदलतात, ही लोकशाहीची विटंबना असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी पक्षाची तुलना “पत्त्याच्या बंगल्याशी” केली. पक्षाचे संपूर्ण राजकीय अस्तित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अवलंबून असल्याचा दावा करत, त्यांच्या नेतृत्वाशिवाय ही रचना टिकणे कठीण जाईल, असे ते म्हणाले.
विकास म्हणजे केवळ उड्डाणपूल, रस्ते किंवा बांधकाम नव्हे, तर राहण्यायोग्य, सुयोग्य नियोजन असलेली शहरे उभारणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विकासाच्या नावाखाली बांधकाम, पैसा आणि सत्तेचे राजकारण यांनाच प्राधान्य दिले जात असून, शहरांच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.