गणना अर्ज घेऊन चक्क जिल्हाधिकारी दारात

कोपरी-पाचपाखाडीत मतदार विशेष सखोल पुनरिक्षणाला वेग

ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानाला प्रत्यक्ष गती मिळाली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः गणना अर्ज घेऊन नागरिकांच्या दारात पोहचले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे मतदार नोंदणी आणि जनजागृती उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी ‘बीएलओ’ भेट देत आहेत. कोपरी-पाचपाखाडीत राबवलेल्या या मोहिमेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, नगरसेविका नम्रता भोसले-जाधव, नायब तहसीलदार संजय साळुंके, बीएलओ उमेश खेडकर, महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मतदार यादीतील भाग क्रमांक २९७ मधील अनुक्रमांक १३५ चे सुरेंद्र इंदर भाटिया, अनुक्रमांक १३६ च्या कविता सुरेंद्र भाटिया, अनुक्रमांक २८७ चे विनोद गंगाधर पेणकर तसेच अनुक्रमांक ४७१ च्या जयश्री पेणकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात गणना अर्ज प्रदान करण्यात आला.

विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानांतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलन करत आहेत. यावेळी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, आपल्या भागातील बीएलओ व निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती अचूकपणे द्यावी आणि गणना अर्ज वेळेत भरून जमा करावा. सशक्त, पारदर्शक आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी ही विशेष पुनरिक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.