वाहनतळ घेणार उद्यानाचा बळी!

कोलशेतमधील आरक्षित भूखंडाचे विभाजन करण्याचा ठामपाचा डाव
ठाणे: एकीकडे शहरात मोठमोठे प्रकल्प आणि गगनचुंबी इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे नागरिकांना मैदाने आणि उद्यानांअभावी मनोरंजनाची माध्यमे कमी झाली आहेत. अशावेळी कोलशेतमध्ये उद्यानासाठी आरक्षित भूखंडाचे विभाजन करून तेथे वाहनतळाचा घाट महापालिकेने घातला आहे. याबाबतचा प्रस्ताव वादग्रस्त ठरणार असून नागरिकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
कोलशेत येथील सर्व्हे क्रमांक ९९/२/१, ११४/४ आणि ११५/२ या भूखंडावर मूळ विकास आराखड्यानुसार उद्यान आरक्षण होते. परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेता या जागेवर भविष्यात सार्वजनिक उद्यान विकसित होण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांना होती. मात्र विकास योजनेतील बदलांच्या प्रक्रियेदरम्यान या आरक्षणात बदल करण्यात आला आणि उद्यानाऐवजी वाहनतळासाठी आरक्षण प्रस्तावित करण्यात आले.
हा बदल चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा दावा करत भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी संबंधित जागेवरील उद्यान आरक्षणाचे दोन तुकडे न करता पूर्ववत करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने महापालिकेला संबंधित आक्षेपांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नगर रचना विभागाने या प्रकरणाचा फेरविचार केला.
सुनावणीदरम्यान डुंबरे यांनी संबंधित जागा उद्यानासाठी राखीव असल्याचे नमूद केले. त्याचे दोन तुकड्यात विभाजन करून इमारतीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने अशा मोकळ्या जागांचे महत्त्व अधिक असल्याचे नमूद केले. वाढत्या काँक्रीटीकरणाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हरित क्षेत्र टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. मात्र नगररचना विभागाने हे आक्षेप नामंजूर करत पार्किंग आरक्षण तेही दोन तुकड्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की प्रारूप सुधारित विकास योजनेत बगीचा आरक्षण रद्द करून त्याऐवजी पार्किंग आरक्षण क्रमांक २५१ समाविष्ट करण्यात आले आहे. ही प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झालेली असल्याने आता मूळ बगीचा आरक्षण पुन्हा लागू करणे किंवा त्याचे पुनर्नियोजन करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे डुंबरे यांचे निवेदन नामंजूर करण्यात आले.
शहरातील मोकळ्या जागा आणि हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत असताना बगीच्यासाठी राखीव असलेली जागा वाहनतळासाठी वापरण्याचा निर्णय योग्य की अयोग्य, यावरून नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
चौकट
महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार डोंगरीपाडा येथे प्रस्तावित मेट्रो स्थानकामुळे भविष्यात प्रवाशांची मोठी वर्दळ होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानक परिसरात वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहराच्या वाहतूक नियोजनाचा विचार करता संबंधित भूखंडावर पार्किंग प्लाझा उभारणे अधिक गरजेचे असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे.