मुंब्र्यात जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त जनजागृती रॅली
ठाणे: जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त एमएसपी केअर फाउंडेशन आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंब्र्यात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. वाढत्या तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.
यावेळी तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांचे प्रतीकात्मक दहन करून व्यसनांविरोधात ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे युवकांनी आणि नागरिकांनी तंबाखूपासून दूर राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले .
कार्यक्रमात बोलताना नगरसेविका मर्जिया पठाण म्हणाल्या, “आजची तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याची बाब चिंताजनक आहे. तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात तंबाखूची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर व विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात आली.
या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये तंबाखूविरोधी संदेश पोहोचण्यास मदत झाली असून व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.
रॅलीमध्ये विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, साकिब दाते, नाजुक बुबेरे, मैसूर शेख यांच्यासह नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी नागरिकांनी हातात जनजागृतीपर फलक घेत तंबाखूमुक्त समाजाचा संदेश दिला.