* ठामपात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची चलती
* स्थानिक अधिकाऱ्यांचे पदोन्नतीकडे डोळे
ठाणे: ठाणे महापालिका एकीकडे नोकरभरती करत असताना दुसरीकडे दीड वर्षापासून स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नती न दिल्याने सहायक आयुक्त पदाची धुरा सांभाळताना एकही स्थानिक अधिकारी दिसत नाही. प्रभारी कार्यालयीन अधीक्षकांच्या खांद्यावर सहायक आयुक्त पदाचा भार टाकून महापालिका कारभार हाकत आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना कधी पदोन्नती देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर १८ सहायक आयुक्त पदाच्या जागा आहेत. त्यामध्ये स्थानिक ५० टक्के आणि प्रतिनियुक्तीवरील ५० टक्के अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे, परंतु सचिन बोरसे या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यास महापालिकेत सामावून घेण्यात आल्याने ते एकमेव स्थानिक सहाय्यक आयुक्त आहेत. उर्वरित आठ जागांवर महापालिकेतील स्थानिक कार्यालयीन अधीक्षकांना प्रभारी पदभार देऊन त्यांच्याकडून सहायक आयुक्त पदाचा गाडा हाकला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये काही अधिकारी सहायक आयुक्त पदाकरिता पात्र आहेत, परंतु २०२१च्या शासनाच्या अध्यादेशामुळे या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली नाही, त्यामुळे एकही स्थानिक अधिकारी सहायक आयुक्त म्हणून महापालिकेत कार्यरत नाही. दोन वर्षांपूर्वी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले होते. आत्ताही काही अधिकाऱ्यांची निवृत्ती जवळ आली आहे तर काही जणांचा निवृत्तीचा काळ एक ते दीड वर्ष इतका राहिला असून त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे जुलैमध्ये तर उपायुक्त मनिष जोशी हे ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर देखिल स्थानिक उपायुक्त नियुक्त होऊ शकणार नाही. बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नसते. सद्या महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची चलती असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
याबाबत मुख्यालयाचे उपायुक्त श्री. गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि २०२१च्या अध्यादेशानुसार पदोन्नतीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांची पदोन्नती होत नाही किंवा ते निवृत्त होत नाहीत तोपर्यंत इतरांना पदोन्नती देता येत नाही. महापालिकेतील तीन ते चार अधिकाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरु असून पुढील दोन ते तीन महिन्यांत स्थानिक सहायक आयुक्त महापालिकेत नजरेस पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला