ठाणे महापालिकेत १७७३ पदांची भरती करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण ७५ हजारांवर अर्ज आले असून तांत्रिक कारणांमुळे सहा महिन्यांपासून रखडलेली भरती होणार असल्याने अर्जदारांच्या शाश्वत नोकरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आरोग्य, अग्निशमन आदी खात्यांत ही भरती होणार आहे आणि त्याबाबत पुढील तजवीज केली जात आहे.
एकीकडे प्रशासनातर्फे निवड-प्रक्रियेतील तांत्रिक बाबींची काळजी घेतली जात असली तरी प्रत्यक्ष निवडीत त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे सांगता येत नाही. महापालिकेत आता लोकप्रतिनिधींची राजवट सुरु झाल्यामुळे त्यांचा सहभाग या प्रक्रियेत नसेलच असे म्हणता येणार नाही. सरकारी नोकरभरती नेहमीच संशय आणि वादांत गुरफटत असल्याचा सर्वसामान्य अनुभव आहे. वशिलेबाजी ते भ्रष्टाचार अशा गुणवत्तेला मारक गोष्टी या प्रक्रियेत घडत असतात. ठाणे महापालिका कोणतेही गैरप्रकार होऊ देणार नाही, ही अपेक्षा आहे.
कोणत्याही आस्थापनेची कार्यसंस्कृती ही तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. ठाणे महापालिकेच्या बाबतीत बोलायचे झाले तर कार्यक्षमता आणि जनतेशी असलेली वर्तणूक या दोन आघाड्यांवर संस्कृती फार दिलासादायक नाही. कार्यतत्परता आणि जनतेचे समाधान या दोन निकषांवर मोजणी झाल्यास कार्यसंस्कृतीत मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. जे वर्षानुवर्षे महापालिकेच्या सेवेत आहेत, त्यांच्यापैकी सर्वांवर कार्यसंस्कृती बिघडवल्याचा ठपका ठेवता येणार नाही. काही कर्मचारी आणि अधिकारी वाखणण्याजोगे काम करतात. त्यांच्या कार्यपद्धतीत जनतेबद्दल असलेली तळमळ जाणवते. परंतु असे कर्मचारी अल्प प्रमाणात आहेत. बहुतांशी कर्मचारी पाट्या टाकण्याचे काम करतात आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यात मोठा हातभार लावतात. संगणक वगैरेंचा वापर होत असला तरी काम करण्याची पद्धत जुनीच आहे. त्यामुळे फाईली साठवण्याचे प्रमाण आजही लक्षणीय आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि उत्तरदायीत्वाबाबत वरिष्ठ विचारत नाहीत. महापालिकेतील भ्रष्टाचारास काही कर्मचारी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे खतपाणी घालत असल्यामुळे त्यांच्याकडून लोकाभिमुख कामाची अपेक्षा ठेवणेच फोल ठरेल.
या पार्श्वभूमीवर तब्बल १७७३ नवीन कर्मचाऱ्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये महापालिकेची प्रतिमा बदलण्याची मोठी संधी आली आहे. ती वाया जाता कामा नये. जितकी नि:पक्ष आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी प्रक्रिया होईल तितके बरे. भरतीमुळे गुणवत्तेला लागलेली ओहोटी थांबावी हीच अपेक्षा!