ठामपा कर्मचाऱ्यांच्या बढतीच्या आनंदावर पडले विरजण

पदोन्नती मिळाली; कार्यभार नाही!

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यांपूर्वी पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, यातील ५४ कार्यालयीन उपअधिक्षक आणि ४९ लिपीकांना अद्याप बढतीच्या पदाचा कार्यभार देण्यात आलेला नसल्याने त्यांना जुन्याच पदाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.

ठाणे महापालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. तसेच काही पदोन्नत्तींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले. त्यामुळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नत्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार, ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील ३८ उपशिक्षकांना (प्राथमिक विभाग, मराठी माध्यम) मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. तर, ५४ वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ४९ कर्मचाऱ्यांना लिपीक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यापाठोपाठ अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना, तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर २ जणांना पदोन्नती देण्यात आली होती. एकूण १५८ जणांना पदोन्नती देण्यात आली होती.

पदोन्नतीच्या या निर्णयांमुळे महापालिका कर्मचारी, शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र, वरिष्ठ लिपीक आणि उप कार्यालयीन अधिक्षक यांना पदोन्नती मिळून १५ दिवसांचा कालावधी लोटला तरी त्यांना पदाचा कार्यभार अद्याप देण्यात आलेला नाही. ज्या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. त्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना कार्यभार देण्यात आलेला नसल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.

कोणत्या विभागात जागा शिल्लक आहेत, त्याची माहिती घेऊन त्या जागेवर पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात येईल. येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आस्थापना उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी सांगितले.