‘मुजोरी’ला क्षमा नाही; धडा शिकवला महिलांनी!

उर्मट, गुन्हेगार रिक्षाचालकांना नारीशक्तीचा दणका

ठाणे: भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, त्यांना मारहाण करणे, धडक देऊन पलायन करणे असे प्रकार रिक्षाचालकांकडून होत असतानाच रिक्षा व्यवसायात गुन्हेगार मंडळीही शिरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर कायद्याचे उपचार तोकडे पडत असल्याचे दिसत आहे. या मुजोरीचा कडवट अनुभव आलेल्या महिलांनी मात्र या रिक्षाचालकांना नारीशक्तीचा दणका दाखवल्याचे गेल्या दोन दिवसात पहायला मिळाले आहे.

जवळचे भाडे मिळाले म्हणून उद्धटपणे वाद घालून हात उगारणाऱ्या रिक्षाचालकाला महिला प्रवाशाने कडक शब्दांत खडसावून त्याची अरेरावी मोबाईलमध्ये कैद केली. तिच्या या आक्रमक भूमिकेमुळे रिक्षाचालक नरमलाच शिवाय वाहतूक पोलिसांनी ठोठावलेला दंडही त्याला भरावा लागला. हा प्रकार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घडला. दुसरा प्रकार डोंबिवलीत घडला असून धडक देऊन पलायन करणाऱ्या रिक्षाचालकांचा पाठलाग करून एका महिलेने त्याला गाठत चांगलाच हिसका दाखवला तर भिवंडीत अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला कर्कटकचा प्रसाद देणाऱ्या मुलीच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या रिक्षाचालकास आज अटक करण्यात आली आहे.

या घटनांबाबतचे सविस्तर वृत्त असे की काल संध्याकाळी ठाण्यातील तीन हात नाका येथे जाण्यासाठी दोन महिला प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्टेशन येथून एमएच ०४ एलएक्सb०२९१ या क्रमांकाची रिक्षा पकडली होती. या रिक्षा चालकाने पुढे गेल्यानंतर महिलेबरोबर अर्वाच्य भाषेत वाद घातला. प्रवासी महिलेने विडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली असतानाही मुजोर रिक्षाचालक तिच्याबरोबर हुज्जत घालत होता. कासारवडवली येथे जाणार आहे, त्याचे भाडे घेईन असे त्यांना सांगत असताना महिलेने जवळचे भाडे घेण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करता, यायचे नसेल तर अगोदर का नाही सांगितले? असा प्रश्न रिक्षा चालकाला केला. तेव्हा त्याने तिच्यावर हात उगारल्याचे झालेल्या चित्रीकरणात पाहायला मिळत आहे. या वायरल झालेल्या विडिओच्या आधारे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रिक्षाचालक श्रीकांत राठोड याच्या विरोधात प्रवाशाबरोबर असभ्य वर्तन केल्याबद्दल अवघ्या ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. मात्र या रिक्षाचालकाचा शोध मनसेचे कार्यकर्ते घेत असून तो भेटला तर त्याला चोप देणार असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

धडक देणाऱ्या रिक्षाचालकाला महिलेने घडवली अद्दल

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात केळकर रस्त्याने पायी चाललेल्या एका ३० वर्षीय महिलेला शुक्रवारी संध्याकाळी पाठीमागून एका रिक्षा चालकाने रिक्षाची जोराने धडक देऊन रिक्षेसह पळून गेला. महिलेने पाठलाग करून इंदिरा चौकात त्याला अडवले आणि चांगलेच खडसावले. वाहतूक पोलिसांसमोर हा सगळा प्रकार घडला. अखेर रिक्षा चालकाने हात जोडून महिलेची माफी मागितल्याने रिक्षा चालकाची सुटका झाली.

शुक्रवारी संध्याकाळी एक पादचारी महिला डोंबिवली पूर्व येथील केळकर रस्त्याने चालली होती. या वर्दळीच्या रस्त्यावर एका रिक्षा चालकाने या महिलेला पाठीमागून रिक्षाची जोरदार दोन वेळा धडक दिली. महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून रिक्षा चालकाने भरधाव वेगात रिक्षा इंदिरा चौकाच्या दिशेने काढली. कारण नसताना रिक्षा चालकाने धडक दिल्याने संतप्त झालेल्या महिलेने रिक्षाच्या पाठीमागून वेगाने पळत जाऊन इंदिरा चौकात पळणाऱ्या रिक्षा चालकाला रिक्षासह अडविले. त्याला फैलावर घेत धडक का दिली म्हणून जाब विचारला. धडक देऊन मदत करण्याऐवजी पळून का जात होतास, असे प्रश्न महिलेने केल्यावर रिक्षाचालक गडबडला. या गोंधळामुळे इंदिरा चौकात कोंडी झाली. चौकात गस्तीवर असलेले वाहतूक पोलीस अधिकारी, वाहतूक सेवक यांच्या समोर हा गोंधळ सुरू होता. संतप्त महिला रिक्षा चालकावर रोष व्यक्त करत होती. या चालकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी तिची मागणी होती. महिलेचा आवेश पाहून वाहतूक पोलीसही शांत होते. ते रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या तयारीत होते.

रिक्षाचालक पळून जाईल म्हणून ही महिला रिक्षासमोर उभी राहून जाहीरपणे रिक्षा चालकावर आपला राग व्यक्त करत होती. या महिलेकडून आपणास मार पडणार असे वाटू लागल्यावर वाहतूक सेवकाच्या सूचनेप्रमाणे रिक्षा चालकाने हात जोडून संतप्त महिलेची माफी मागितली. तरीही महिला ऐकण्यास तयार नव्हती. अशा बेदरकार, मुजोर रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी महिलेची भूमिका होती. अखेर वाहतूक पोलिसांनी महिलेची समजूत काढल्यावर बेदरकार रिक्षा चालकाचा मार्ग मोकळा झाला. संतप्त महिला रिक्षाच्या मार्गातून बाजुला झाली. असा प्रकार पु्न्हा केला तर भर रस्त्यात तुडविण्याचा इशारा या महिलेने रिक्षा चालकाला दिला.

‘तो’ रिक्षाचालक अखेर जेरबंद

भिवंडी येथे रिक्षातून शाळेत निघालेल्या विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. तिने स्वरक्षणासाठी कर्कटकचा वापर करुन पळ काढला होता. अखेर या विद्यार्थीनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शांतीनगर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

भिवंडी येथे इयत्ता १० वीत शिकणारी १६ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. ती भिवंडी येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तिची दररोज दुपारच्या सत्रात शाळा असते. त्यामुळे ९ जुलैला ती दुपारी १२ वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार तीने घराजवळून रिक्षातून प्रवास सुरु केला. त्यावेळी ती रिक्षामध्ये एकटीच प्रवास करत होती. रिक्षा काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रवासी रिक्षामध्ये बसला. शाळेजवळ रिक्षा पोहचल्यानंतर तिने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितली. परंतु त्या चालकाने रिक्षा थांबविली नाही. त्यानंतर रिक्षामधील प्रवाशाने तिला गप्प बसण्यास सांगितले. रिक्षा चालक चाविंद्र येथे रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी समय सूचकता दाखवित विद्यार्थीनीने दप्तरातील कर्कटक बाहेर काढून रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानंतर शेजारी बसलेल्या प्रवाशास धक्का मारून रिक्षातून उडी मारत पळ काढला. ती शाळेत पोहचली. शाळेतून घरी आल्यानंतर तिने याबाबतची माहिती तिच्या आई आणि वडिलांना सांगितली. ११ जुलैला या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक आणि त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला होता. घटनेबाबतची माहिती भिवंडीत पसरल्यानंतर पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित रिक्षाचालक आणि त्याच्या साथिदारावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम १३७ (२) आणि ६२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पथके तयार केली.

विद्यार्थीनीला परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविण्यात आले. परंतु रिक्षा चालकाची ओळख पटत नव्हती. अखेर सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्वेषणाच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव अजगर शेख असून तो भिवंडी येथील रहिवासी आहे. तो मुळचा उत्तर प्रदेश येथील असून विद्यार्थीनीने त्याची ओळख पटविल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसऱ्या एकाचा पोलीस शोध घेत आहेत.