७८ वर्षानंतरही भिवंडी तालुक्यातील राऊत पाड्याला मिळेना रस्ता
पडघा: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही भिवंडी तालुक्यातील खंबाळा ग्रामपंचायत हद्दीतील राऊत पाड्यातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास सुरूच आहे. डांबरी रस्ता नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे.
राऊत पाड्यात २०० हून अधिक लोकांची वस्ती आहे. हा पाडा ग्रुप ग्रामपंचायत खंबाळा आणि दाभाड या दोन ग्रामपंचायत हद्दीत येत आहे. या पाड्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता हा दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतून जात आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या जागा या कच्च्या चिखल पायवाट रस्त्यामध्ये येत आहेत. त्यामुळे हे शेतकरी रस्ता बांधकामासाठी मज्जाव करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे खंबाळा, दाभाड ग्रामपंचायत प्रशासनाने राऊत पाड्यातील रस्ता व्हावा याकरिता भिवंडी तहसीलदार कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे प्रस्ताव सादर केला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार राऊत पाडा, परशुराम पाड्याकरिता रस्ता वहिवाटीचा असून तो डांबरी किंवा काँक्रीटीकरण करून तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ता तत्काळ न बनवल्यास राऊत पाड्यातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्षी तरी राऊत पाड्यातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची चिखलातील वाट मोकळी होणार का? याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.