फेरीवाले-बेशिस्त रिक्षाचालकांनी स्टेशन परिसर केले अस्ताव्यस्त

ठाणे: ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य ठाणेकर मेटाकुटीला आले असून परिवहन मंत्री ठाण्यातील असताना असे हाल होत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गोखले रोड गावदेवी मंदिर ते अलोक हॉटेल येथून ठाणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग एकेरी आहे, त्या मार्गाचा वापर रिक्षा चालकांनी करू नये यासाठी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी लोखंडी बॅरिकेड्स लावले असून हे बॅरिकेड्स बिनधास्त हटवून रिक्षाचालक सर्रास या एकेरी मार्गाचा वापर करत असून त्याच मार्गावर फेरीवाल्यांनीही बस्तान ठोकले आहे, त्यामुळे या मार्गावरून तसेच पदपथावरून जाताना ठाणेकर चाकरमानी मेटाकुटीला आला आहे. हा मार्ग चालण्यासाठी राहिलाच नाही. रस्त्यावर रिक्षाचालक आणि पदपथावर फेरीवाले यात येथिल रस्ता आणि पदपथ हरवून गेले आहेत. या मार्गांवरून चालताना रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांमध्ये खटके उडत आहेत. वाहतूक पोलिस रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करत नाहीत कि महापालिका फेरीवाल्यांना हटवत नाही. वाहतूक पोलिसांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. रेल्वे स्टेशनपासून दीडशे मिटरपर्यंत फेरीवाल्यांना मनाई असतानाही त्या नियमाचे सर्रास उल्लंघन करून फेरीवाले धंदा करत आहेत. त्यांच्या विरोधात कधी कारवाई करणार? असा सवाल ठाणेकर उपस्थित करत असून आज भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात तसेच मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. जागरुक ठाणेकर सुधाकर चिपळूणकर यांनी देखिल फेरीवाले आणि रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. वाहतूक विभागाच्या पोलिसांना चिरीमिरी देऊन रिक्षाचालक त्यांच्या डोळयांदेखात बॅरिकेड्स तोडून एकेरी मार्गांवर रिक्षा चालवत असल्याचा आरोप केला.