ऑनलाईन दिवाळी खरेदीत उडाला फसवणुकीचा बार

बनावट वेबसाईट्स, ऑफर्स, फेक लिंक्सचा सुळसुळाट

ठाणे: एकीकडे दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा आणि फेस्टिव्हलमध्ये नागरिकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत असून दुसरीकडे घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन खरेदीचाही धडाका सुरू आहे. मात्र ग्राहकांच्या वाढत्या पसंतीचा फायदा घेत काही बनावट कंपन्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी बनावट लिंक्स, संकेतस्थळे देऊन सर्वसामान्यांना आमिषे दाखवून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करू लागली आहेत. अशा भूलथापांना बळी पडू नका, जागरूकता दाखवून खरेदी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांतच ठाणे व मुंबई परिसरात फेक वेबसाईट्स, बनावट ई-मेल लिंक, क्युआर कोड पेमेंट फसवणूक, व नकली डिलिव्हरी एजंट्स अशा अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तक्रारी नोंदवण्याची संख्या तुलनेत कमी असली तरी अनेक पटीने फसवणूक होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषता हजार, पाचशे रुपयांच्या फसवणुकीसाठी कुणीही पोलिस ठाणे गाठत नाही. एखादी मोठी रक्कम खात्यातून गेली तरच तक्रार नोंदवली जात आहे. त्यामुळे सायबर लुटारुंना रान मोकळे झाले आहे.

ऑनलाईन खरेदीबाबतीत अनेक प्रकार घडत असल्याचे ठाणे सायबर पोलिसांचे म्हणणे असून त्यांनी त्याचा उलगडा करत सावधान कसे राहता येईल या विषयी मार्गदर्शन केले आहे.

सायबर विभागाचे वरिष्ठ निरिक्षक प्रकाश वारके यांनी दिलेल्या माहितीनुसार काही बनावट वेबसाईट्स मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या नावाने तयार केल्या जात आहेत. एखादी वस्तू आपण गुगलवर सर्च करत असताना हॅकर्स ते हेरतात. आणि फेसबूक, इंस्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर सेकंदात त्याच्या जाहिराती सुरू होतात. यामध्ये नामांकित कंपन्यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांची विश्वासार्हता जपली असली तरी बनावट कंपन्या त्याचा फायदा घेत कमी दर्जाच्या वस्तू घरपोच पाठवत आहेत. असे शेकडो प्रकार सध्या घडत आहेत.

दुसरीकडे ‘फ्लॅश सेल’च्या नावाखाली पेमेंट घेतल्यानंतर साइट गायब होण्याचे अनुभवही अनेकांना येत आहेत. काही ठिकाणी लोकांना ‘लकी ड्रॉ जिंकला’ म्हणून लिंक पाठवून कार्ड डिटेल्स घेतल्या जातात. डिलिव्हरी बॉय बनून ओटीपी विचारूनही फसवणूक केली जात आहे. यासर्व जाळ्यात ग्राहक विशेषता महिला वर्ग अलगद सापडत आहेत, असे वारके यांनी सांगितले.

या फसवणुकीबाबत सायबर पोलिसांना सावधगिरीच्या सूचना केल्या आहेत. फेक लिंकवर क्लिक करू नका. क्युआर कोड स्कॅन करण्यापूर्वी पडताळा करा. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर आर्थिक संबंधी माहिती देऊ नका. ऑफर्स फारच आकर्षक वाटत असतील तर ती फसवणूक असू शकते. अधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाईटवरूनच खरेदी करा. ऑनलाइन पेमेंटसाठी सुरक्षित गेटवे वापरा. शक्यतो रोख रकमेत व्यवहार करा आणि तो करताना वस्तू आधी तपासून बघा आणि सर्वात महत्वाचे संशयास्पद व्यवहार लगेच सायबर पोलिसांकडे १९३० या क्रमांकावर कळवा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.