वादग्रस्त उड्डाणपुलाचे उदघाटन मे महिन्यात

भाईंदर मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोसमांतर उभारण्यात आलेला वादग्रस्त उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या रचनेवरून यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. चार मार्गिकांचा असलेला पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांमध्ये कमी होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला होता. या रचनेवरून एमएमआरडीएवर जोरदार टीका करण्यात आली होती. वाद वाढल्यानंतर प्राधिकरणाने पूल योग्य असून भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा केला होता. तसेच याबाबत अधिकृत भूमिका आणि पत्रकही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले होते. तरीही नागरिकांचे समाधान झाले नाही. परिणामी, वाद निवळण्यासाठी वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. तसेच आयआयटी संस्थेचा सल्ला घेऊन पुलाच्या रचनेत थोडेफार बदल करण्यात आले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दहिसर काशिगाव मेट्रो पुलाच्या उद्घाटनप्रसंगी हा पूल योग्य असल्याचा दावा करत पुलाच्या वादावर पडदा टाकला. त्यामुळे आता पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयोजन एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत आखले जात आहे. त्यानुसार ७ मे ते १० मे दरम्यान या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहेत. मात्र, हा पूल उभारणीपासूनच वादग्रस्त ठरल्यामुळे या पुलाच्या लोकार्पणासाठी हे लोकप्रतिनिधी पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे छोटेखानी कार्यक्रम करून हा पूल सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

शहराच्या मुख्य मार्गावर एमएमआरडीएने मेट्रोसमांतर तीन उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. यापैकी दोन पूल सुरू करण्यात आले असून हा अंतिम पूल बाकी आहे. परिणामी, या पुलाखाली दीपक हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे हा पूल सुरू झाल्यास प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.