महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण

सुटकेसाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी

ठाणे: येथील शिळफाटा रस्त्यावरील गोळवली भागातील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात आपल्या कुटुंबियांसह राहणाऱ्या के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षाच्या विद्यार्थ्याचे अज्ञाताने चार महिन्यांपूर्वी अपहरण केले आहे. गेल्या आठवड्यात मुलाच्या घरी असलेल्या मोबाईलवर अज्ञात इसमाने संपर्क साधून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. ती नाही दिली तर मुलाच्या जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी अज्ञाताने दिली आहे.

शंकरनारायण धुलीपाला (२१) असे अपहृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. कृष्णा धुलीपाला हे शंकरनारायणचे वडील मुंबईत नोकरी करतात. शंकरनारायण याचा १२ जानेवारी २०२५ रोजी नेवाळी नाका भाल भागातील आदर्श विद्यानगरीतील कोनार्क आयडियल महाविद्यालयात दुपारी २ वाजता सीएचा पेपर होता. हा पेपर ५ वाजता सुटणार होता. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचावे म्हणून शंकरनारायण घरातून दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान बाहेर पडला.

तो रिक्षेतून परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जात होता. परीक्षेला जाताना त्याने मोबाईल घरी ठेवला होता. संध्याकाळ सहा वाजले तरी शंकरनारायण घरी आला नाही. म्हणून कुटुंबीयांनी महाविद्यालय परिसर, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात त्याचा शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो कोठेही आढळून आला नाही. त्यामुळे वडील कृष्णा यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली. या मुलाचा कुटुंबीय अद्याप शोध घेत आहेत.