ठाण्याचा चिमुकला आदिराज मेस्त्री जागतिक क्रमवारीत अव्वल!

ठाणे: मलेशियामध्ये ‘आयमा जागतिक चॅम्पियनशीप’ या जगप्रसिद्ध ॲबॅकस’ आणि ‘मेंटल अरथमॅटीक अलाइन्स’ स्पर्धेद्वारे जगातील १४ देशांच्या ६ ते १४ वयोगटातील जागतिक स्पर्धा परिक्षा आयसीटी सेलेंगोर, मलेशिया या ठिकाणी जुलै महिन्यात पार पडली.या स्पर्धेत सहा वर्षांच्या आदिराज मेस्त्री याने १४ देशांच्या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकाविले.

यापूर्वी कु.आदिराज हा संपूर्ण भारतीय स्तरावर सुपर चॅम्पीयन म्हणून गौरविला गेला होता. या स्पर्धेत भारत, तैवान, मलेशिया, इंडोनेशिया, जपान, साऊथ कोरिया, श्रीलंका, चीन, साऊथ आफ्रिका, पनामा, लेबनॉन, कंबोडीया, इराक, रशिया या देशांतील एकूण ४८८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताने एकूण ८७ पदके मिळवून जागतिक स्तरावर दुसरे स्थान प्राप्त केले. तर, इंडोनेशियाने अव्वल क्रमांक मिळवला.

ठाण्याच्या ‘न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा आदिराज मेस्त्री हा मुंबई येथील प्रख्यात ‘वंडर किडस् ॲकेडमी’मध्ये प्रशिक्षण घेत असुन शिक्षक प्रशिक्षक लीना पाटील, गौरी दौंड आणि ॲकेडमी प्रमुख आशुतोष पाटील यांनी प्रचंड मेहनत घेऊन अनेक विद्यार्थी घडविले आहेत. आदिराजचे वडील दिग्विजय मेस्त्री आणि आई अमृता ही महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाच्या महापारेषणमध्ये संगणक अभियंता आहेत. तर राजपत्रित अधिकारी अनुराधा मेस्त्री आणि प्रसिध्द साहित्यिक डॉ. राम मेस्त्री यांचा आदिराज नातू आहे. आदिराज याच्या आईचे वडील स्व. दिलीप जगदाळे हे महापारेषणचे अधिक्षक अभियंता होते. लहान वयात मिळवलेल्या यशाबद्दल आदिराजचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.