ठाणेकर बॅडमिंटनपटुंची जोरदार कामगिरी
ठाणे: ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशनच्या योनेक्स सनराइज खुल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विविध गटांमध्ये ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी पदकांची लयलूट केली.
एकूण १४ गटांचा समावेश असणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांमधून अनेक उमद्या बॅडमिंटनपटूंनी सहभाग घेतला होता.
पुरुष एकेरीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारा क्रिश देसाई याने पहिल्या फेरीपासून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करीत एक हाती बाजी मारली. उपउपांत्य फेरीत अंश मेहता याचा १५-३, १५-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करून क्रिशने उपांत्य फेरीत धडक मारली उपांत्य फेरीच्या सामन्यात हिमांशू देसाई याचा १८-२१, १६-२१ असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीच्या अतिथटीच्या सामन्यात त्याने हर्ष शर्माला २१-१३,१३-२१,२१-१२ असे नमवून आपल्या सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली. त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीत पुन्हा एकदा ठाणेकर जोडी कुवाळे बंधू यांनी भाजी मारली. उपांत्य फेरीत त्यांचा सामना ठाणेकर खेळाडू प्रतीक रानडे आणि जिनांश जैन या जोडी सोबत झाला. यात विराज आणि विप्लव हे वरचढ ठरले आणि त्यांनी २१-१३, २१-१४ असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत त्यांचा सामना अर्जुन आणि सिद्धेश राऊत यांच्याशी झाला व यांना विराज आणि वीप्लवने २१-५,२१-४ असे सहज मिळवुन पुन्हा एकदा दुहेरीतील ठाणेकरांचे वर्चस्व कायम ठेवले. याच गटात प्रतीक रानडे याला व तसेच क्रिश आणि इयान लोपेझ यांना ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.
केवळ बॅडमिंटनच्या सरावासाठी नाशिकमधून ठाण्यात शिफ्ट झालेल्या विश्वजीत ठेवील या छोट्या बॅडमिंटन पटूने आपल्या उत्तम खेळीने तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकावून अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात राफेल मस्करहेनेस या खेळाडूचा विश्वजीतने २१-१२,१९-२१,२१-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आणि अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात अष्लोन पिंटो या खेळाडूचा पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले .
त्याचप्रमाणे तेरा वर्षाखालील मुलींमध्ये सनाया ठक्कर हिनेदेखील कमाल कामगिरी करत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यापासून उत्तम खेळाचे सादरीकरण करत सुवर्णपदक जिंकण्याची आपली जिद्द सनायाने व्यक्त केली होती. सेमी फायनल च्या लढतीत अनिका तनेजा हिला २१-१०,२१-६ असे नमवून सनायाने अंतिम फेरी धडक मारली परंतु अंतिम फेरीच्या सामन्यात तिला हार पत्करावी लागली. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत सुद्धा ठाणेकर विराज कुवाळे यांनी बाजी मारली आहे तर विप्लव कुवाळे यांनी रौप्य पदक पटकावले आहे.
या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर, तसेच क्रीडा अधिकारी श्रीमती मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने खेळादूना शुभेच्छा दिल्या आहेत.