ठाणेकर दिव्यांग बांधवांना मिळणार विविध योजनांचा लाभ

खासदार नरेश म्हस्के यांचा पाठपुरावा

ठाणे: ठाणेकर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी विविध योजना ठाणे महापालिका प्रशासनाला सुचविल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनांची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानंतर समाज विकास विभागाच्या उपयुक्त अनघा कदम यांनी उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिल्याने दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

ठाणे महापालिकेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, दिव्यांग नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आदर्श आज इतर तालुक्यांमध्ये आणि राज्यातील विविध महापालिकांमध्ये घेतला जात आहे.

यावर्षी दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या नव्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात थोडा विलंब झाला होता. खासदार नरेश म्हस्के हे सातत्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत होते. धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या दिव्यांग विभागाच्या अधिकारी अनघा कदम यांची दिव्यांग बांधवांनी भेट घेतली. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी देखील त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधला.

खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी अनघा कदम यांना स्पष्ट निर्देश दिले की, उद्याच्या उद्या या योजनांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यावर दिव्यांग नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी उशीर होऊ शकतो. अनघा कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असं आश्वासन दिलं. विशेषतः पुढील पंधरा दिवसांत दिव्यांग बांधवांना या योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.