काळू नदीवरील धरणाच्या कामाला गती द्या

भाजपच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे: ठाणे महापालिकेकडे स्वतःचे स्वतंत्र धरण नसल्यामुळे घोडबंदर वासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून मार्गी न लागलेल्या काळू नदीवरील प्रस्तावित धरण कामाला गती देणे आणि दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी ठाण्यातील भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सर्वसामान्य जनतेच्या हिताला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच प्राधान्य दिले असून ठाणेकरांच्या अपेक्षा मुख्यमंत्री नक्की सोडवतील असा विश्वास आहे. सध्या ठाणे शहरात शटडाऊननंतर निर्माण होणारी पाणीटंचाई आणि घोडबंदर परिसरात मोठमोठ्या गृहसंकुलांमुळे जाणवणारी भीषण पाणी समस्या यावर कायमचा तोडगा निघण्यासाठी म्हणून मागील अनेक वर्षांपासून काळू नदीवरील प्रस्तावित धरणाला लवकरात लवकर गती देण्याची विनंती मृणाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

मुंबई ते ठाणे अंतर अवघे ४५ मिनिटे इतकेच आहे. परंतु वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील जवळपास ७० टक्के नागरीक दररोज नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबईसह इतर ठिकाणी जातात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना नियोजित वेळेत पोहचण्यासाठी दोन ते अडीच तास लागत असून त्यातच मेट्रोचे ईस्टर्न फ्री वे पर्यंत ठाण्यापर्यंत विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश आपण संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली.