स्पर्धांसाठी ठाण्यात मैदान मिळत नसेल तर मुंबईत उपलब्ध करू देऊ; एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक यांची ग्वाही

ठाणे: आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या क्रिकेटच्या बेस स्पर्धा आहेत. त्यातच ही स्पर्धा सलग ४७ वर्षे खेळवणे, हे मोठे काम आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट संघाला चांगले खेळाडू मिळाले आहेत. ठाणे शहरामध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जर मैदान उपलब्ध होत नसतील तर आयोजकांनी मुंबईत यावे, त्यांच्यासाठी उपलब्ध असतील ते-ते मैदान अशा स्पर्धांसाठी देऊ, असे आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी ठाण्यात शुक्रवारी बोलताना दिले.

ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवरील मैदानावर खेळविण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध ४६ व्या एन.टी.केळकर स्मृति आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. त्यावेळी नाईक बोलत होते.

शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या 16 वर्षांखालील स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विरुध्द वसंत विहार स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. श्री माँ विद्यालयाने वसंत विहार स्कूलचा पराभव करत एन. टी. केळकर चषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्या वर्षी श्री माँ विद्यालयाने चषक जिंकण्याची किमया केली आहे. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न, ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

45 षटकांच्या या स्पर्धेत वसंत विहार संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वसंत विहार संघाला श्री माँ विद्यालयाच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगलेच धक्के दिले. मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जयस्वा कोठारी याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 68 धावा केल्या. वसंत विहार संघाने 34.3 षटकात 10 बाद 127 धावा केल्या.  श्री माँ संघाचे गोलंदाज आदित्य कौलगी 4 बळी, रुग्वेद जाधव 3 बळी तर अद्विक मंडलीक याने 2 गडी बाद केले. 127 धावांचा पाठलाग करतांना श्री माँ विद्यालयाच्या रुजुल रांजणे आणि कामेश जाधव या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. अथर्व सुर्वे 33 धावा, आदित्य कौलगी नाबाद 22 धावा, कामेश जाधव 16 धावा, रुजुल रांजणे याने 15 धावा केल्या. श्री माँ संघाने हा सामना 42.5 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला.

स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष संजय नाईक यांचे विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कोकण पदवीधर चे आमदार निरंजन डावखरे, सेंट्रल मैदान कमिटीचे अध्यक्ष डॉ.राजेश मढवी, स्टेडियमच्या व्यवस्थापक मिनल पालांडे, ठाणे जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन चे सेक्रेटरी एम.डी.मराठे, अध्यक्ष जयंत वेलदे , सदानंद केळकर आदी उपस्थित होते बाळाराम खोपकर यांनी सूत्रसंचालन केले.