रेल्वे प्रशासनाचा लाल दिवा; विकासकामांना दीर्घ थांबा 

ठाणे: रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे पूर्व ठाण्यातील सॅटीस साडेचार वर्षे रखडला असून ठाणेकरांना वेठीस धरण्याची परंपरा कायम ठेवली आहे. परिणामी ठाणेकर रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठाणे पश्चिमला स्टेशन परिसरात येण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने साडेचार वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेतून ठाणेकरांसाठी सॅटीस आणि विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पांचा नारळ विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाढविण्यात आला होता. ठाणे महापालिका हद्दीतील सॅटीस पुलाचे काम जोरात सुरु असले तरी रेल्वेच्या हद्दीतील कामांना मात्र रेल्वेकडून वेळोवेळी लाल दिवा दाखवला जात आहे.

ठाणे स्टेशन सुधारणा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, परंतु त्या कामाची सुरुवात अजूनही झाली नाही. पूर्व भागातील रेल्वे परिसरात उभारण्यात येणाऱ्या इमारतीचा आराखडा अजूनही महापालिकेकडे सादर करण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षांपासून पूर्व भागातील पार्किंगच्या जागेत खोदकाम करून ठेवण्यात आलेले असून त्याचा विकासही रखडला आहे. महापालिकेने सादर केलेल्या कामात त्रुटी काढून काम रखडविण्याची परंपरा या कामात देखिल कायम राखली आहे. रेल्वेच्या हद्दीत ठाणे महापालिकेचे यापूर्वी विटावा पूल, पश्चिम भागातील सॅटीस आणि पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कामांना देखिल मंजुरी देताना अनेक वर्षे लावली होती. तिच परिस्थिती पूर्व भागातील सॅटीसबाबत रेल्वे करत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे विस्तारित रेल्वे स्टेशनची अजूनही निविदा निघालेली नाही, त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्ष ठाणेकरांना वाट पाहावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात हे काम सुरु असून त्यांचे पुत्र खासदार आहेत. केंद्रात त्यांचे वजन असल्याने त्यांनी या कामात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी ठाणेकरांची मागणी होत आहे.