विकासाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पॅटर्न देशासाठी आदर्श

क्रेडाई एमसीएचआयच्या प्रदर्शनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे ठामपणे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाचा व्यापक आराखडा मांडला.

क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिटतर्फे आयोजित वेस्ट काऊंटी येथे भरविलेल्या २३व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आज शानदार उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित विकासक, बँक अधिकारी आणि मान्यवरांना शुभेच्छा देताना त्यांनी “चलो ठाणे” हे गाणे सर्वत्र व्हायरल करण्याचे आवाहन केले. येताना टनेल मशीन पाहिल्याचा उल्लेख करत त्यांनी सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची गती अधोरेखित केली. सकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसले तरी आपण दरवर्षी या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी होत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

ठाण्यात ५० लाखांपासून १२ कोटींपर्यंत घरांचे विविध पर्याय उपलब्ध असून, या एक्स्पोमुळे अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “घर देणं हा आशीर्वाद आहे,” असे नमूद करत एसआरए आणि म्हाडा प्रकल्पांमध्ये घरांच्या चाव्या देताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा सर्वात मोठे समाधान देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ४० लाख घरांचे स्वप्न दाखवले होते, ते पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिका, सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथे १७ हजार घरांची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. २० वर्षे भाडे न मिळालेल्या नागरिकांना १६० कोटी रुपयांचा निधी देऊन न्याय दिल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईप्रमाणे ठाणेही झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ठाणे, वडाळा, घाटकोपर, गायमुख, मीरा-भाईंदर असा मेट्रो लूप तयार होत असून, ठाणे-भिवंडी-कल्याण-अंबरनाथ-तळोजा मार्गे दुसरा लूप नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. ३३७ किमी मेट्रो नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ठाण्यात अंतर्गत मेट्रो सुरू होत असून ती मुख्य मेट्रोला जोडली जाणार आहे. ठाणे-बोरिवली प्रवास दोन तासांवरून १२ मिनिटांवर आणण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल उभारण्यात आले असून, पर्यावरणाचे रक्षण करत हा प्रकल्प पूर्ण केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येत असून मुंबई आणि ठाण्यातही तो उभारला जाणार आहे. ही पॉड टॅक्सी मॉल्सपर्यंतही जाणार असल्याने नागरिकांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत. रस्ते, मेट्रो आणि पॉड टॅक्सीमुळे वाहतूक सुरळीत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घोडबंदर रोड ३०० फूट करण्यात आला असून एलिव्हेटेड रोड, कोस्टल रोड आणि एमएमआरडीएचे तीन मोठे ब्रिज उभारले जात आहेत. गायमुख परिसरातून ग्रामीण भाग जोडून ‘नवीन ठाणे’ विकसित केले जाणार आहे. यामुळे ठाण्यातील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच ठाण्यात वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करण्याची योजना असून सेंटर पार्क, गायमुख चौपाटी आणि इतर प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
“झाडे लावा” असे आवाहन करत विकासकांनी वृक्षारोपणावर भर द्यावा, असे सांगताना त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजच्या पार्श्वभूमीवर ग्रीन कव्हर वाढवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
कांदळवन संरक्षणासाठी कायदा करून ग्रीन टीडीआर देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक प्रकल्प पर्यावरणपूरक असावा, असा आग्रह त्यांनी धरला.

कोविड काळात काही बिल्डर्स “ऑक्सिजनवर तर काही व्हेंटिलेटरवर” असल्याची उपमा देत त्यांनी त्या काळातील परिस्थिती स्पष्ट केली. प्रीमियम ५०टक्के कमी करताना ग्राहकांना त्याचा लाभ देण्याची अट घालण्यात आली. स्टॅम्प ड्युटी सवलत आणि हप्त्यांची सुविधा देऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला. “सरकारचा फायदा सामान्य माणसाला झाला पाहिजे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून परवडणारी घरे बांधणे विकासकांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिअल इस्टेट क्षेत्र कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे असून २५० उद्योग या क्षेत्रावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.

ठाण्यातील जोगीला तलाव परिसरातील झोपडपट्ट्या हटवून या तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील सर्व तलावांचे सुशोभीकरण आणि जतन करण्याचे निर्देश ठाणे मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या तलाव स्वच्छता अभियानाचा उल्लेख करत मासुंदा तलावाचे उदाहरण त्यांनी दिले. कॅडबरी रोडसारख्या प्रकल्पांमुळे परिसरातील मालमत्ता दर वाढल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या दोन कोटी घरांच्या उद्दिष्टात विकासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की महाराष्ट्र जीडीपी, परकीय गुंतवणूक आणि स्टार्टअपमध्ये देशात अव्वल आहे आणि 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत राज्याचा 1 ट्रिलियन डॉलर वाटा साध्य करण्याचे लक्ष्य आहे.

यंदा `एमसीएचआय है तो भरोसा है’ या टॅगलाईनने होणाऱ्या प्रदर्शनात शहरातील ४० हून अधिक नामांकित बिल्डर, प्रसिद्ध बँका व वित्तसंस्थांची दालने आहेत. सुमारे ५० लाखांपासून प्रीमियम वॉटरफ्रंट घरांपर्यंत विविध घरांचे पर्याय आणि महत्त्वाच्या ठिकाणच्या रिटेल जागांचा समावेश आहे. या प्रदर्शनात ऑन द स्पॉट कर्जेही मंजूर केली जात आहेत. ग्राहकांच्या बजेटनुसार घरांचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

या प्रसंगी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, एसबीआय’चे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र धिंग्रा, क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे’ संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी, राजू व्होरा, सचिव फैय्याज विराणी, दोस्ती ग्रुपचे राजूभाई गरोडीया, एमसीएचआय ठाणे शाखेचे अध्यक्ष सचिन मीराणी, प्रॉपर्टी प्रदर्शनाचे अध्यक्ष विभव बोरकर, बोरकर रिएल्टीचे महेश बोरकर, युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता, नगरसेवक संजय भोईर, विकासक जय व्होरा तसेच विविध विकासक, प्रमुख बँकांचे कर्ज विभागातील अधिकारी आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.