महासभेत होणार जोरदार चर्चा
ठाणे : तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत नसल्याने महापालिकेतील नगरसेवकांना त्यांच्या हक्काचा निधी तसेच नागरी सुविधांच्या कामांना देखिल निधी मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेचा ६२२१ कोटींचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला होता, त्यावर सविस्तर चर्चा होऊन ३१मार्च रोजी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. त्या अर्थसंकल्पाची अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रभागात विकास कामे करून मतदारांची मने जिंकायची आहेत, परंतु निधीच मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाच्या मागणीची शेकडो पत्रे धुळखात पडली आहेत. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काही निधी दिला आहे, त्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत आहेत, परंतु नगरसेवकांचा हक्काचा नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळत नसल्याने नगरसेवक मेटाकुटीला आले आहेत.
पावसाळ्यात गटार, नाले यांची कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे, परंतु अर्थसंकल्प मंजूर नसल्याने कामाच्या फायली तयार करता येत नाहीत. कोणत्या कामाला कोणता निधी द्यायचा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे, त्यामुळे फायली तयार करण्यात आल्या असल्या तरी त्याला निधी नसल्याने जेव्हा निधी मिळेल त्यानंतर कामाच्या फायलींचा प्रवास सुरु होईल,असे एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले. याबाबत आज सर्वपक्षीय गटनेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि गटनेते पवन कदम यांनी सांगितले की लवकरच नगरसेवकांना निधी वितरित करण्यात येईल, असे सांगितले.