ठाण्यात १२ तासांचे शटडाऊन २४ तासांवर

पाणीटंचाईचे संकट गडद

ठाणे: मान्सून लांबून धरणांच्या पातळीत घट होत असताना ठाणे पालिकेने १५ दिवसांतून एकदा होणारे १२ तासांचे शटडाऊन आता आठवड्यातून एकदा २४ तासांचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात ठाणेकरांवरील पाणीसंकट अधिक गडद होणार आहे.

जून महिन्याचा मध्य उलटूनही पावसाने साधी हजेरीही लावलेली नाही, अशात जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा लक्षणीय खालावला आहे. ठाणे शहराला विविध स्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या जलस्रोतांमधून दररोज सुमारे ९० एमएलडी पाणी मिळते. या पाण्यावर नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, किसननगर, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, जय भवानीनगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, मानपाडा, कोपरी, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर, गांधीनगर आणि कन्हैयानगरसह अनेक भागांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

या भागांमध्ये यापूर्वीच १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून ती अनिश्चित कालावधीसाठी कायम ठेवण्यात आली आहे. धरणांमधील साठा आणि पावसाची परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जलसाठ्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विविध पर्यायांचा अभ्यास सुरू केला आहे. सध्या १५ दिवसांतून एकदा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येतो. मात्र पावसाचा विलंब कायम राहिल्यास आणि धरणांतील पाणीपातळी आणखी खालावल्यास हा शटडाऊन आठवड्यातून एकदा २४ तासांचा करण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या निर्णयामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होईल आणि उपलब्ध जलसाठा अधिक काळ पुरवता येईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र अंतिम निर्णय पावसाच्या परिस्थितीवर आणि धरणांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकेवर अवलंबून राहणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमआयडीसीने आधीच आठवड्यातून २४ तासांसाठी २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. याचा सर्वाधिक परिणाम कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील नागरिकांवर होत आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी पाणी मिळण्याचा कालावधीही घटला आहे.