नजीब मुल्ला यांचा सभागृहात कागदपत्रांसह खळबळजनक आरोप
ठाणे: पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीमध्ये ठाणे महापालिका ४९.५ टक्के भागीदार असताना मागील चार वर्षांत ठाणे महापालिकेचे पाणी कमी करून ठाणेकरांच्या हक्काचे पाणी ठाणे महापालिकेने विकले, असा खळबळजनक आरोप शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. विशेष म्हणजे याबाबत आपल्याकडे कागदपत्रे देखील असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला आहे.
१९८७ साली स्टेम कंपनीची स्थापना झाली, त्यावेळी ठाणे महापालिकेला १२७ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र हा पाणीपुरवठा वाढण्याच्या ऐवजी तो ११३ एमएलडीवर आला आहे. महापालिकेने मीरा-भाईंदर आणि भिवंडीसह विकासक आणि गोडाऊन मालकांना देखील पाणीपुरवठा केल्याचा आरोप मुल्ला यांनी यावेळी केला. मुल्ला यांच्या या आरोपांमुळे आता प्रशासन चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
सुपर एल निनोचे येणारे संकट यावर शिवसेनेचे राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी सभागृहात लक्ष्यवेधी मांडली. यावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हा गंभीर आरोप ठाणे महापालिका प्रशासनावर केला. मुल्ला यांनी या विषयावर चर्चा करताना पुढचे युद्ध हे तेलापेक्षा पाण्यावरच होण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आज ठाण्यात सर्वच भागात तीव्र पाणीटंचाई आहे. मग हे पाणी जात कुठे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी स्टेम कंपनीची स्थापना झाली त्यावेळी म्हणजेच १९८७ साली ठाणे महापालिकेला १२७ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मीरा-भाईंदर महापालिका भिवंडी आणि भिवंडीच्या ग्रामीण भागात असा मिळून २२० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र एवढ्या वर्षात ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा वाढण्याऐवजी तो कमी होऊन इतर महापालिकांचा पाणीपुरवठा वाढला असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी सभागृहात दिली.
गेल्या चार वर्षात ज्यावेळी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नव्हती त्यावेळी स्टेमचे हक्काचे हेच पाणी ठाणे महापालिकेने इतर महापालिका, भिवंडी ग्रामीणमधील नऊ गावे तसेच विकासक आणि गोडाऊनच्या मालकांना वळवले असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला. स्टेम कंपनीमध्ये ठाणे महापालिका ही ४९.५ टक्के भागीदार असून ठाणे महापालिकेचे आयुक्त हे त्याचे अध्यक्ष असतात. मात्र असे असताना ठाण्याचे पाणी कमी करून इतरांना वळवल्याचा आरोप मुल्ला यांनी केला असल्याने यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
बांधकाम साईटवर ठाणे महापालिकेचे अजिबात नियंत्रण नाही, विकासकाकडून बोरिंगऐवजी टॅपिंग करून ठाणे महापालिकेचेच पाणी वापरण्यात येत आहे. जे नागरिक सध्या राहात आहेत त्यांचा आधी पाण्यावर अधिकार आहे. पाणी नसेल तर नवीन बांधकामांना पाणी न देता अशा बांधकामांचे पाणी थांबवण्याच्या सूचना त्यांनी सभागृहात दिल्या.
कळव्यात डोंगरपट्ट्यात आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याचे नजीब मुल्ला यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. डोंगरावर पाण्याचे प्रचंड हाल आहेत. तीन तीन ड्रम पाणी घेऊन नागरिकांना जावे लागत असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.
स्टेमकडून वाढलेले पाणी एमएलडीमध्ये
महापालिका पूर्वी आता
ठाणे १२७ ११३
मीरा-भाईंदर २१ ८०
भिवंडी ४८ ६७
भिवंडी ग्रामीण ११ ४०