ठामपा महासभेत भाजपचे ठिय्या आंदोलन
ठाणे: ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपातून विस्तवही जात नसताना आज शुक्रवारी पुन्हा महासभेत दोन्ही पक्षांत ठिणगी उडाली. अवघ्या पाच मिनिटांत शिवसेनेने २३१ प्रस्ताव मंजूर केल्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील व्यासपीठावरून खाली उतरले. यावेळी भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत शिवसेनेला विरोध केला. शेवटी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी चालत नौपाडा पोलीस स्टेशन गाठत शिवसेनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पटलावर एकूण २३२ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या सभेपुर्वी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आधी विषयपत्रिका आणि त्यानंतर लक्ष्यवेधी आणि प्रश्नोत्तरे असे क्रम ठरविण्यात आले. मात्र महासभेत भाजपने विषयपत्रिकेआधी प्रश्नोत्तरे घेण्याचा आग्रह धरला तर, शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषयपत्रिका घेण्याचा आग्रह धरला. याच कारणारून दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने-सामने येऊन त्यांच्यात खडाजंगी झाली. नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादही झाले. याच गोंधळादरम्यान, चर्चेविनाच अवघ्या पाच मिनिटांत २३२ पैकी २३१ विषय मंजुर केल्याने भाजप नगरसेवक संतापले तर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून गोंधळात मंजुर केलेल्या विषयांवर चर्चा करण्याचा आग्रह धरला. तसेच त्यांनी नगरसेवकांसह व्यासपीठावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, शिवसेनेने राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करत आंदोलन मोडीत काढले. यामुळे भाजप नगरसेवक अधिकच आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सांगितले. सभागृहाबाहेरही दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सभागृहातील गोंधळावर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनीही सभागृहात नाराजी व्यक्त केली. जो काही प्रकार घडला, तो योग्य नव्हता. प्रत्येक सदस्यांंना विषयावर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले तरी सभेचे कामकाज सुरू ठेवण्याची भूमिका गटनेत्यांच्या बैठकीत मांडली होती. गटनेत्यांच्या बैठकीत जे ठरते, त्याचे पालन झाले पाहिजे. यापुढे बैठकीतील निर्णय लेखी स्वरूपात घ्यावे लागतील, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
गोंधळात विषय मंजूर करण्याची प्रथा आम्हाला मान्य नाही. आम्हाला प्रत्येक विषयावर चर्चा हवी होती, अशी भूमिका उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मांडली. राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत आयुक्त आणि महापौरांना निवेदन देणार असून पोलिसांत तक्रारही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेची चौथी सर्वसाधरण सभा होत असताना पालिकेची स्थायी समिती, परिवहन समिती, स्विकृत सदस्य तसेच इतर समित्या का गठीत झालेल्या नाहीत, असा प्रश्न भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी विचारला. त्यावर महापौर, उपमहापौर, गटनेते जाहीर झालेले नसल्यामुळे पहिल्या सभेत हा विषय मागे घेण्यात आला तर, दुसरी सभा होळी आणि रमजानमुळे गटनेत्यांनी स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सभा स्थगित केली होती. मात्र, आता गटनेत्यांची बैठक घेऊन याबाबत महापौर निर्णय घेतील, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.